सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी एकत्र आरती करणं टाळलं,बारामतीत झाली संत तुकोबारायांची महाआरती
आय मिरर
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीतील शारदा प्रांगणात विसावलाय. या सोहळ्याच्या स्वागताला खासदार सुप्रिया सुळे खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील उपस्थित होत्या. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची महाआरती पार पडली मात्र सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्रित आरती करणे टाळल्याचं पहायला मिळालं… एकट्या सुनेत्रा पवार यांच्या हस्तेच तुकोबारायांची महाआरती झाली.यावेळी दूरच्या अंतरावरूनच सुप्रिया सुळे या नामस्मरणात रंगल्याचं पहायला मिळालं त्यांच्या शेजारी त्यांची आई प्रतिभा पवार देखील उपस्थित होत्या.
गवळ्याच्या उंडवडीतून पालखी सोहळा बारामतीकडे मार्गस्थ झाल्यानंतर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाचे सारथ्य करीत वारकऱ्यांसोबत फुगडी ही धरली. यानंतर हा पालखी सोहळा बारामती शहरात सायंकाळी दाखल होताच खासदार सुनेत्रा पवार यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आई प्रतिभा पवार यांनी देखील शारदा प्रांगणामध्ये उपस्थिती लावत या सोहळ्याचं स्वागत केलं आणि तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेतलं.
आज सकाळी हा पालखी सोहळा बारामतीकरांचा निरोप घेऊन इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे दरम्यान सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती पासून त्यांच्या काटेवाडी गावापर्यंत या सोहळ्यात पायी चालणार आहेत तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पिंपळी गावामध्ये पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत.
बारामतीतल्या फलकानं साऱ्यांचाच लक्ष वेधलं..
राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारेच सारखे आहेत. असाच काहीसा हा संदेश देणारा एक फलक तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने बारामती शहरात उभा करण्यात आला आहे.राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत असं या बॅनरवर लिहण्यात आले आहे. वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रित छापण्यात आले आहेत.
ताईंनी दिली वहिणींना हाक…
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये विसावला. या सोहळ्याच्या स्वागतासाठी खासदार सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघीही उपस्थित होत्या. या ठिकाणी सोहळा विसावल्यानंतर समाज आरती होत असते. या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना हात केला. आरतीला या तुम्ही म्हणत त्यांनी राजकारण आणि कुटुंब वेगळ असल्याचे दाखवून दिले.
What's Your Reaction?