"भावी खासदार" म्हटलं की करेक्ट कार्यक्रम होतो; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा भाजपच्या बैठकीत इच्छुकांना दणका
आय मिरर
भावी खासदार म्हणून कोणी पोस्टर लावण्याच्या भानगडीत पडू नका, काहीजण तसे करत आहेत; पण तसे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो. पक्ष समजतो त्यांना हे सांगण्याची गरज नाही, या शब्दात अतिउत्साही इच्छुकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पक्षाच्या बैठकीतच दणका दिला आहे.
प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महाविजय अभियानाचे विभागीय संयोजक, लोकसभा मतदारसंघ संयोजक, विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांची बैठक दादरमधील पक्ष कार्यालयात झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
काहीजण तसे पोस्टर लावत असल्याचे कानावर येत आहे. ज्यांना भाजप कळतो त्यांना तसे केल्याने काय होते हे चांगलेच ठाऊक आहे. तिकीट कोणाला मिळणार हे पक्षाचे संसदीय मंडळ, ज्येष्ठ नेते ठरविणार आहेत. त्यात डोके लावू नका. सामान्य, गरीब माणसाशी कनेक्ट ठेवा, तीच आपली कोणत्याही सर्वेक्षणात न येणारी व्होटबँक आहे, असे खडे बोलही फडणवीस यांनी सुनावले.
आपला विजय पक्का, पण म्हणून प्रयत्न सोडू नका. कुणाला तिकीट मिळणार, कुणाला नाही, याची चिंता तुम्ही करू नका. केंद्र आणि राज्य सरकारने प्रचंड विकासकामे केली, जनकल्याणाच्या योजना आणल्या, ही कामगिरी प्रत्येकापर्यंत पोहोचवा. जातीपातीपलीकडे मोदींची व्होट बँक आहे, हे समजून पुढे चला.निवडणूक ही थंड डोक्याने लढवायची असते. तुम्हाला कोणत्या गोष्टीवर वैताग आला असेल तर तो पक्षात मांडा, पक्षाबाहेर बोलू नका. वाचाळवीरांना आवरावेच लागेल. सर्वांचे वहीखाते पक्षाकडे आहे, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दणक्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कडून महायुती मधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी दिली जाईल अशा चर्चा होत्या,मध्यंतरी सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर देखील झळकल्याच पाहायला मिळालं.तोच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे घराण्याच्या सुनबाई अँड. निहार बिंदू माधव ठाकरे यांच्या पत्नी अंकिता पाटील ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन दिनी इंदापूर शहरात भावी खासदार असे होर्डिंग लागल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अंकिता पाटील ठाकरे बारामती लोकसभा लढवतील अशा चर्चा रंगल्या होत्या.
गेल्या काही वर्षापासून बारामती लोकसभा जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीने तह केला आहे.तसे प्रयत्नही झाले मात्र त्या प्रयत्नांना अद्याप पर्यंत यश आलेलं नाही.आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बारामतीत कमळ फुलवायचं हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्क केलं आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून भाजप बारामती लोकसभा मतदारसंघात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करते आहे. केंद्रीय मंत्र्यांचे दौरे देखील झाले आहेत.मात्र लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या तरी देखील सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार कोण हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.अर्थात अनेक दिग्गज चेहरे समोर असताना नेमकी संधी कोणाला दिली जाणार की भारतीय जनता पार्टी एखादा नवीनच चेहरा शोधणार असे अनेक प्रश्न जनसामान्यांना पडले आहेत.
What's Your Reaction?