‘त्या’ आमदाराचं काय झालं? अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?
आय मिरर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ९ मे २०२४ रोजी अजित पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली होती. या सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुलं आव्हान दिलं होतं. "अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?", अशा आपल्या शैलीत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अशोक पवार जिंकले की पराभूत झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
शनिवारी (२३) रात्री या प्रश्नाचं उत्तर मिळालं. शिरूरमध्ये अशोक पवार पराभूत झाले आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी अशोक पवारांचा ७४,५५० मतांनी पराभव केला आहे. कटके यांना १,९२,२८१ मतं मिळाली, तर अशोक पवारांना १,१७,७३१ मतं मिळाली आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात माहयुतीने बहुमत मिळवलं आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
दरम्यान, राजकीय विश्लेषक, पत्रकार व सामान्य जनता देखील या निवडणुकीचं आपापल्या परीने विश्लेषण करत आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकला, किती मितं मिळाली, कोणता उमेदवार पडला, बलाढ्य उमेदवारांचं काय झालं, कौटुंबिक लढतींचं काय झालं, हाय व्होल्टेज लढतींचं काय झालं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अशीच एक लढत शिरूर मतदारसंघात पाहायला मिळाली आहे. कारण, या मतदारसंघातील आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवारांनी जाहीर आव्हान दिलं होतं.
निवडणुकीनंतर सर्वांना धक्का देणारा निकाल
निवडणुकीनंतर सर्वांना धक्का देणारा निकाल समोर आला आहे. महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अवघ्या १० जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ, राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
What's Your Reaction?