बिग ब्रेकिंग || ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने इंदापूरच्या काझडमध्ये हवेत गोळीबार

Nov 7, 2023 - 10:32
Nov 7, 2023 - 10:33
 0  1726
बिग ब्रेकिंग || ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने इंदापूरच्या काझडमध्ये हवेत गोळीबार

आय मिरर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकित पराभूत झाल्याच्या कारणातून गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील काझड गावात घडलीय. वालचंदनगर पोलिसांनी या प्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन काझड मधील राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी दि.०६ नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील काझड मध्ये काझड-अकोले रोडवर अकोले चौकात ही घटना घडली आहे.घटना समजताचं वालचंदनगर पोलिस रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले होते. चौकशी अंती वालचंदनगर पोलीसांनी दोघांवरती गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचे निवडणुकित पराभूत झाल्याचे कारणावरुन गावात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने संगनमताने शिवीगाळ करून त्यांचे जवळील अग्निशस्त्रातून हवेत गोळी फायर केली. फिर्यादी काटकर व साक्षीदार त्यांचा पाठलाग करत असताना मौजे काझड - अकोले रोड वर अकोले चौकाचे पुढे त्या दोघांनी त्यांचेकडील ग्रे रंगाची सेलिरिओ कंपनीची कार नंबर MH 42 BB 2450 ही फिर्यादी गणेश काटकर हे रस्त्याचे मध्ये थांबून गाडी अडविण्याचा प्रयत्न केला असता काटकर यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अंगावर गाडी घातली. त्यानंतर मौजे वायसेवाडी, ता. इंदापुर येथे एका रानात त्यांची कार सोडुन अंधाराचा फायदा घेवून ते पळून गेले.

सदर गुन्ह्याचा तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow