"डाॅक्टर गोरे म्हणतात प्रसंग बाका होता पण आमची उमेद कायम होती" बुध्दी कौशल्य अथक प्रयत्न आणि दृढ विश्वासाच्या जोरावर आम्ही त्या दहा महिन्याच्या कोवळ्या जीवाला वाचवू शकलो…वाचा असं काय घडलं होतं
आय मिरर
गेल्या काही दिवसात इंदापूर शहर वैद्यकिय दृष्ट्या प्रगत झालयं का? असा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर हो असं मिळतं. कारण मागील चार पाच दिवसापूर्वी इंदापूरात जे घडलं अन् डाॅ.पंकज गोरे आणि त्यांच्या टीम जे केलं ते नक्कीच कौतुकास्पद आहे. बुध्दी कौशल्य आणि अथक प्रयत्न व दृढ विश्वासाच्या जोरावर त्यांनी अवघ्या दहा महिन्याच्या कोवळ्या जिवाला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढलयं.या संदर्भातील सविस्तर अशी माहिती डाॅ.पंकज गोरे यांनी दिली आहे.
डाॅ.गोरे असं सांगतात की,15 सप्टेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास साधारण दहा महिन्याचे बाळ घेऊन एक आई व आजी धावत पळत हॉस्पिटलमध्ये आल्या. गडबडीने बाळाला थेट रुग्ण तपासणीच्या टेबल वरती ठेवून अतिशय चिंताग्रस्त मनस्थितीत सांगू लागल्या की बाळ काल संध्याकाळपर्यंत एकदम ठीक होते व रात्रीपासून बाळाला रक्तासारखे मोठे मोठे सात-आठ जुलाब झालेले आहेत व बाळाचे पोट फुगायला सुरुवात झालेली आहे. बाळाने रात्रीपासून काहीच खाल्लेले नाहीये व थोडंसं दूध पिल्यानंतर बाळाने दोन ते तीन वेळा पित्ताच्या पिवळ्या हिरव्या अशा उलट्या केलेल्या आहेत बाळ अतिशय कोमेजलेला आहे.
बाळाला तपासताच माझ्या लक्षात आले की बाळाचे पोट अतिशय कडक झालेले आहे व बाळाच्या शरिरात रक्त अतिशय कमी प्रमाणात आहे. बाळाला धाप लागत होती त्यामुळे बाळाला त्वरित ऑक्सिजन लावला आणि थोडेसे सलाईन देऊन बाळ स्थिर केले. त्वरित सोनोग्राफी व रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या.त्यानंतर असं निदर्शनास आले की बाळाच्या आतड्याला तीव्र रूपाचा पीळ पडलेला आहे. कदाचित बाळाचे आतडे आत मध्ये कुजून फुटलेले असू शकते. यालाच वैद्यकीय भाषेत इंटूससेप्शन विथ परपोरेशन ऑफ स्मॉल इंटेस्टईन असे म्हणतात. हा अत्यंत धोकादायक व जीवघेना आजार असतो.
दहा महिन्याच्या बाळाला अशा प्रकारचा तीव्र स्वरूपाचा व अचानक उद्भवलेल्या त्रासामुळे सर्वजण चिंतेत होते. सर्व चाचण्यांचा अहवाल बघता बाळाचे त्वरित ऑपरेशन करणे तसेच बाळाला रक्त भरणे हे अत्यावश्यक आहे असे आम्ही नातेवाईकांना समजावून सांगितले व त्यानुसार बाळाचा बीपी स्टेबल करण्यासाठी सलाईन थोडीशी इंजेक्शन व रक्त देण्यास आम्ही सुरुवात केली.
गणरायाला घालत होतो साकडं…
तातडीने सोलापूरच्या डॉक्टरांना ऑपरेशन साठी बोलावून घेतले व बाळाची कंडीशन, धोके नातेवाईकांना समजावून सांगून त्यांच्या संमतीनेच ऑपरेशनला सुरुवात केली. ऑपरेशन सुरू करताना आम्ही व नातेवाईकांनीही गणरायाला साकडे घातले की आमच्या बाळाच्या जीवाला काहीही इजा होऊ देऊ नको.देवावरती विश्वास ठेवून आम्ही सर्व ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो व बाळाचे आतड्याला पडलेला पीळ बाजूला करून खराब झालेले आतडे हे कट करून राहिलेले आतडे पूर्ववत सूक्ष्मरित्या जोडून यशस्वीरित्या ऑपरेशन केले. यालाच वैद्यकीय भाषेत एक्सप्लोरेटरी लॅप्रोटॉमी विथ एन्ड टू एंड ॲनास्टोमोसिस असे म्हणतात.
गोष्ट फक्त ऑपरेशन साठीच सीमित नव्हती. ऑपरेशन नंतरही बाळाचे रक्त कमी होत होतं, ऑपरेशन दरम्यान ही बाळाला रक्त भरण्यात आलं ऑपरेशन नंतर बाळाच्या रक्तातील सोडियम व पोटॅशियमची लेवल कमी झाल्या त्यामुळे हृदयावरती परिणाम होत होता, त्यानुसार आम्ही त्यांना सप्लीमेंट देऊन बाळाच्या शरीरातील कमी जास्त होणारे घटक स्टेबल केले. रक्तदाब स्थिर केला आणि उच्च प्रतीच्या प्रतिजैवक (अँटिबायोटिक्स) चा वापर केला.७२ तास बाळाला एनबीएम म्हणजेच तोंडाने काही न देता ठेवले.
आतड्यांचे हालचाल हळूहळू सुस्थितीत होऊ लागली ७२ तासानंतर बाळाला पाणी देण्यास सुरुवात केली, पाणी पचल्यानंतर बाळाला अंगावरती दूध पाजण्यास सुरुवात केली, हळूहळू दूध पचू लागले तसेच आपण त्याला मऊ भात वरण भाताची गंजी अशा प्रकारचा हलका आहार सुरू केला. त्यानंतर ४८ तासात बाळाला उत्तम प्रकारे आहार पचू लागला बाळाच्या रक्तातील झालेले इन्फेक्शन हे हळूहळू कमी होत गेले, तसेच बाळाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण पोटॅशियम, सोडियमचे प्रमाण स्थिर झालेले होते.बाळ आता हसू खेळू लागले होते त्या बाळाला हसता खेळता बघून आम्हालाही सर्वांना खूप आनंद झाला.
सर्व अहवाल तसेच ऑपरेशनची जखम हे चांगल्या परिस्थितीत असल्याने बाळाला शेवटी रविवारी दि.२४ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज करण्याचा निर्णय घेतला. अतिशय गंभीर परिस्थितीत आलेलं बाळ उत्तमरित्या व नियोजनबद्ध ट्रीटमेंट नुसार ऑपरेशन करून आलेल्या कठीण परिस्थिती वरती मात करून त्या बाळाला जीवनदान भेटले म्हणून आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. गोरे हॉस्पिटलच्या सर्व टीम मेंबर्सनी बाळासाठी खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे सर्व नातेवाईकांनी कौतुक केले.गोरे हॉस्पिटल आता अशा स्वरूपाच्या अकस्मात किंवा सिरीयस प्रकारच्या आजारांच्या उपचारासाठी सदैव तत्पर व सक्षम असल्याचं डाॅक्टर सांगतात.
YOU CAN SAVE YOUR CHILDS LIFE IF YOU KNOW THIS.
काही संभाव्य लक्षणावरून तीव्र स्वरूपाच्या आजार ओळखू शकतो जसे की…
1. लाल लघवी होणे
2. लाल, पिवळी किंवा हिरवी उलटी 3. लाल किंवा काळी संडास होणे
4. लघवी न होणे
5. पायावर किंवा डोळ्याच्या खाली सूज येणे
6. पोट गच्च फुगणे
7. कानातून रक्त येणे
8. जुलाबाच्या रुग्णाचे जुलाब अचानक थांबणे
9. खाताना ठसका लागून कंटिन्यूअस खोकला सुरू होणे
हि लक्षणे आजाराची अति तीव्रता दर्शवणारे आहेत.
What's Your Reaction?