मुद्दा शेटफळ तलावाचा ! आमदार दत्तात्रय भरणेंचा दावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी खोडून काढला ; म्हणाले…
आय मिरर
इंदापूर तालुक्यात शेटफळ तलावात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही माजी मंत्र्यात चांगलीच झुंपली आहे.कोणाच्या प्रयत्नाने इंदापूरातील शेटफळ तलावात पाणी सोडण्यात येतंय यावरून भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात श्रेयवाद उफाळून आला आहे.पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांना निरा डावा कालव्याद्वारे शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले असून सोमवार पासून निरा डाव्या कालव्याद्वारे शेटफळ तलावात पाणी सोडण्यात येणार असल्याचा दावा आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला तोच हा दावा खोडून काढत लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित राहिला हवे होते, असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.
पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार शेटफळ तलाव भरून घेणेसाठी पाणी सोडण्यात आले असून, आज रविवार (दि.24) रात्री पासून हे पाणी तलावात येण्यास सुरुवात होणार आहे. शेटफळ तलाव पुर्ण क्षमतेने भरून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी दिली.
ते म्हणाले, पुणे येथे शनिवार दि. 2 सप्टेंबरला झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा मुद्दा मी मांडला. परंतु तलावामध्ये पाणी सोडता येणार नाही, अशी अधिकाऱ्यांची टिप्पणी होती. मात्र बैठकीमध्ये शेटफळ तलाव पाण्याने भरून घेणे गरजेचे असल्याचा माझा मुद्दा शेवटपर्यंत मी लावून धरला, त्यासाठी अनेक संदर्भ दिले. माझ्या आग्रही मागणीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीमध्ये नीरा डावा कालव्याचे चालू असलेले आवर्तन दि. 20 सप्टेंबर पर्यँत संपवून, लगेच दि. 21 पासून शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय हा कालवा सल्लागार समितीमध्ये जाहीर केला व तसे बैठकीचे इतिवृत्त निघाले. परंतु दि. 21 ला इंदापूर तालुक्यातील फाटा नं.36 व 46 आवर्तन चालू होते. त्या परिसरात पाऊस नसल्याने तेथे आवर्तनासाठी 4 दिवस जास्त देण्यात आले. त्यानंतर कालवा सल्लागार समितीतील निर्णयानुसार आज रविवार रात्रीपासून शेटफळ तलाव भरून घेण्यास सुरुवात होत आहे. शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता 640 एम.सेफ्टी. असून, तलावाला नवीन व्हॉल टाकला जाणार आहे. शेटफळ तलाव भरून घेण्यात येणार असल्यामुळे बावडा व परिसरातील 8-10 गावांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. शेटफळ तलाव पाणी सोडण्याच्या निर्णयाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक ही महत्त्वाची असूनही विद्यमान लोकप्रतिनिधी दि. 2 रोजीच्या सदर बैठकीला उपस्थित नव्हते. त्या बैठकीत शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय मी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करून घेतला. सद्या पाणी सोडणे हा संवेदनशील विषय असल्याने त्याचा निर्णय फक्त पालकमंत्री हे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीद्वारे तसेच जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे घेऊ शकतात. असे असताना मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे काल शनिवारपासून प्रसारमाध्यमांना मी कार्यकारी अभियंत्याला आदेश दिला व त्यामुळे त्यांनी शेटफळ तलावात सोमवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशा बातम्या देऊन शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
What's Your Reaction?