इंदापूर आगार व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराविरोधात बस चालकाचे उपोषण ; वरिष्ठ कार्यालयाने दखल घेण्याची गरज

Jun 17, 2024 - 07:31
Jun 17, 2024 - 13:00
 0  1343
इंदापूर आगार व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराविरोधात बस चालकाचे उपोषण ; वरिष्ठ कार्यालयाने दखल घेण्याची गरज

आय मिरर        

इंदापूर बस आगारातील नादुरुस्त गाड्या चालकांना चालवायला देऊन चालक तसेच प्रवासी यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या आगार व्यवस्थापका विरोधात बस चालकाने आमरण उपोषण सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या अशा आगार व्यवस्थापकाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान उपोषणाचा सहावा दिवस उजाडला असतानाही प्रशासनाकडून कोणतेही ठोस कार्यवाही न झाल्याने उपोषण सुरूच आहे यामुळे एसटी महामंडळाचा उदासीन कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे.      

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर बस आगारातील बस चालक हर्षल रघुनाथ ठोसरे व सुराज्य निर्माण सेनेचे राज्य अध्यक्ष अमर एकाड हे मंगळवार(ता.11 जून)पासून इंदापूर आगाराच्या प्रवेशद्वारासमोर अमरण उपोषण करीत आहेत. दरम्यान त्यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्ते हर्षल ठोसरे व अमर एकाड यांची तब्येत खालावल्याने त्यांना पोलीस प्रशासन व आरोग्य अधिकाऱ्यांनी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांनी पुन्हा उपोषणाला सुरुच ठेवले आहे.रविवारी त्यांच्या उपोषणाचा त्यांचा सहावा दिवस होता.

उपोषणकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर बस आगारात बस गाड्यांची कामे न करता बिगाड झालेल्या गाड्या चालकांना चालवायला आगार व्यवस्थापक इंदापूर हनुमंत गोसावी भाग पाडत आहेत.त्यामुळे बसचे अपघात होतात, अनेक ठिकाणी तर बस बंद पडत आहेत. अशा वेळी होणारी आर्थिक नुकसान भरपाई चालकाकडून वसूल करत असल्याचा प्रकार देखील माहिती अधिकार मधून उघड झाले आहे. या कारभाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी आहे. मात्र प्रशासन चौकशी समिती नेमण्यास तयार नाही यामुळे इंदापूर आगाराच्या कारभारात मोठे गौडबंगाल सुरू आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे. जर तसे नसेल तर प्रशासनाने तात्काळ समिती नेमून अधिकाऱ्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.

तसेच यासंदर्भात पुणे व मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी यांनीही वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई केली नसून ही अंत्यत गंभीर बाब आहे. तरी एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून प्रकरणाची सत्यता पडताळणे आवश्यक आहे अन्यथा उपोषणकर्त्याची तब्येत अजून खालवली जात असल्याने अघटित घटना घडू शकते.

उपोषणकर्त्याने आमच्याशी येऊन चर्चा करावी..

दरम्यान याबाबत एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रण प्रमोद नेहुल यांना संपर्क साधला असता कसली चौकशी समिती नेमली जाणार नाही उपोषण करताना आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि आमच्याशी येऊन चर्चा करावी अशी भूमिका मांडली. तर आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी म्हणाले उपोषणकर्त्याने तब्येतीची काळजी घेऊन वरिष्ठांशी चर्चा करावी.अशीच भूमिका मांडली.दरम्यान या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी चौकशी समिती नेमण्यात का नकार देत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow