Indapur : श्री छत्रपती साखर कारखान्याचं कारभारी व्हायचंय तर मग तोंडी परीक्षा द्या ! सहकारात बहुतेक हे पहिल्यांदाच घडतंय

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा कारभारी व्हायचं असेल तर तुम्हाला आता तोंडी परीक्षा द्यावी लागणार आहे.हो आणि हे सहकारी साखर कारखानदारीत पहिल्यांदाच घडतय.स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ही तोंडी परीक्षा घेणार आहेत.याबाबत निवडणूक समन्वयक किरण गुजर आणि सर्वपक्षीय पॅनल प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.
1955 साली इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. जवळपास 75 वर्षाहून अधिक काळ या कारखान्याने अनेकांचे प्रपंच तारले. आता या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलीय.
त्यासाठी 18 मे रोजी मतदान होणार आहे तर 19 मे ला नवे कारभारी ठरणार आहेत. मात्र संचालक पदासाठी इच्छुकांची तोबा गर्दी असल्याने सहकार क्षेत्रात एक नवा फंडा राबवण्यात येतोय. तुम्हाला जर छत्रपती साखर कारखान्याचे कारभारी व्हायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी अगोदर तोंडी परीक्षा द्यावी लागेल.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी तब्बल सहाशे उमेदवारी अर्ज दाखल त्यापैकी छाननी प्रक्रियेत 122 अर्ज अपात्र ठरले. तर काहींनी स्वतःहून माघार घेतली मात्र तरीही इच्छुकांची गर्दी अफाट आहे. त्यासाठी आता इच्छुकांची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हे ही तोंडी परीक्षा घेणार आहेत. यात जर तुम्ही पास झालात तर आणि तरच तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल. गुरुवारी 24 एप्रिल रोजी बारामती या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
गेल्या दहा वर्षापासून या कारखान्याची निवडणूक रखडली होती. त्यामुळे सत्ताधारी संचालक मंडळाला तब्बल दहा वर्ष संधी मिळाली. पण समाधानकारक काम न केल्याने अजित पवारांनी थेट भर सभेत त्यांचे कान उपटले.गेल्या १० वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या संचालक मंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या भर सभेत इशारा दिला. कुठले नशीब घेऊन जन्माला आले होते, काय माहिती? त्यांना १० वर्ष मिळाली. आता बास त्यांनी थांबावे, अशा शब्दात पवार यांनी जुन्या संचालक मंडळात काम केलेल्या संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची सूचना दिली.
कारखान्याच्या स्थापनेपासून पवार घराण्याच्या अधिपत्याखालीच श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना चालवला जातो. सध्या कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय कारकिर्दीलाही याच कारखान्याच्या संचालक पदापासून सुरुवात झाली. सध्या कारखाना आर्थिक संकटात असल्याने कार्यक्षम असं संचालक मंडळ निवडून कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणे हे पवार कुटुंबीयांपुढे आवाहन आहे.त्यामुळे पवार यांच्या अपेक्षेला खऱ्या ठरणाऱ्या इच्छुकांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे. यासाठी दत्तात्रेय भरणे आणि पृथ्वीराज जाचक यांची भूमिका देखील निर्णायक असणार आहे.
What's Your Reaction?






