अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पाठींब्याने माथाडी कामगारांचे इंदापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू 

Jan 25, 2024 - 19:11
 0  262
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पाठींब्याने माथाडी कामगारांचे इंदापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू 

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील बिल्ट कंपनीत काम करत असणाऱ्या मात्र 2011 साली कंपनीने कामावरून कमी केलेल्या आणि माथाडी कामगार आयुक्तांनी तब्बल गेली तेरा वर्ष प्रतीक्षा यादीत ठेवलेल्या नऊ पैकी पाच माथाडी कामगारांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पाठिंब्याने हे कामगार न्याय आणि हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्य सरकार वर्षानुवर्ष न्याय व हक्कासाठी प्रलंबित असणाऱ्या या कामगारांना आता तरी न्याय देणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

इंदापूर तहसील कार्यालयासमोर समोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार दशरथ बंडगर, राजेंद्र रुपनवर, राजेंद्र पडळकर ,संदीप पडळकर व सचिन राऊत हे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार उपोषणाला बसलेले आहेत.

सदर उपोषण स्थळी इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड माधव शितोळे देशमुख ॲड मधुकर ताटे ॲड दिलीप गिरंजे ॲड सचिन चौधरी ॲड अवधूत डोंगरे ॲड संदीप शिंदे ॲड रवींद्र कोकरे यांचे सह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. या सोबतचं या आंदोलनाला यापूर्वीच भिगवण परिसरातील अनेक ग्रामपंचायती तसेच विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठींबा असले बाबत मराठा महासंघाला लेखी कळविलेले आहे.

आंदोलक दशरथ बंडगर म्हणाले की आम्ही कंपनीमध्ये माथाडी काम चालू झाल्यापासून सदर ठिकाणी काम करीत होतो. सन 2011 मध्ये माथाडी युनियनच्या वादामध्ये माथाडी बोर्डाने पूर्वी काम करणाऱ्या कामगारांना प्रतीक्षा यादी मध्ये टाकून कालांतराने त्यांना कामावर घेण्याचे लेखी दिले होते. असे असताना सदर आदेशाची पायमल्ली करुन माथाडी कामगार भरती केली जात आहे. त्यामुळे आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेतृत्वाखाली आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणापासून मागे हटणार नाही 

 काय आहेत मागण्या…

सहाय्यक कामगार आयुक्त सो पुणे यांनी दिनांक 11/ 11/ 2011 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे परिशिष्ट ब मधील प्रतीक्षा यादीतील कामगार यांना माथाडी बोर्डामध्ये नोंदित करून घेऊन त्यांना माथाडी म्हणून कामावर घेणेत यावे.

सदर दिनांक 11 /11/2011 चा आदेश मान्य नसल्यास तो रद्द करून मूळ 36 माथाडी कामगार ठेवण्यात यावे.

माथाडी बोर्डाने दिनांक 11/11/ 2011 चा आदेश डावलून त्यानंतर आजपर्यंत केलेल्या नोंदीत कामगारांच्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा.

सदर माथाडी बोर्डातील अनागोंदी कारभार करणारे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी.

बिल्ट कंपनीमध्ये सक्षम माथाडी निरीक्षक यांच्याकडून व संघटना प्रतिनिधी यांच्या समक्ष अचानकपणे कंपनीतील वेगवेगळ्या निवेदनात सांगितले ठिकाणची  तपासणी करून माथाडी स्वरूपाचे कामाची पाहणी करून तेथे माथाडी कामगारांची नोंदणी करून भरती करण्यात यावी.

कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे कामगार यांना कायम कामगार म्हणून नियुक्ती करण्यात यावे.

सदर कंत्राटी कामगार यांचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे कायद्याची पायमल्ली करीत आहेत त्यांना संघटनेने मागणी केलेल्या कागदपत्राची पूर्तता करण्यास कंपनी प्रशासन यांनी सांगण्यात यावे.

बिल्ट कंपनीकडून अनेक कायद्याची पायमल्ली होत असून मर्जीतील लोकांमार्फत कायम कामगार केले जातात त्याची चौकशी व्हावी.

बिल्ट कंपनी शेजारील अनेक शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्यावर कायमस्वरूपी ची उपाययोजना करण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी.

सदर बिल्ट कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी कामगार म्हणून प्राधान्याने भरती करण्यात यावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow