इंदापुरात व्यापारी वर्गासह डॉक्टरांशी खा.सुप्रिया सुळेंनी साधला संवाद, व्यापाऱ्यांसह डॉक्टरांनी मांडल्या सुळेंसमोर समस्या
आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर शहरात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर शहरातील व्यापारी वर्गांसह शहरातील डॉक्टर वर्गाशी मंगळवार दि. 16 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात संवाद साधत व्यापारी वर्गासह डॉक्टरांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना व्यापाऱ्यांच्या वतीने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भरत शहा यांनी शहरात वॉकर झोन उभारावा,ऑनलाईन मार्केटला ही टॅक्स लावावेत,त्याचप्रमाणे बजेटमध्ये जीएसटी बाबत व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक सूचना मांडाव्यात अशी मागणी केली.
यासह सोलापूर जिल्ह्यातील चिकलठाण ते इंदापूर तालुक्यातील कालठण किंवा शिरसोडी यादरम्यान उजनी जलाशयावर नव्याने पूल उभारावा जेणेकरून सोलापूर जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याचा व्यापारी संपर्क वाढेल आणि बाजारपेठेला चालना मिळेल अशी मागणी केली. यावर खासदार सुळे यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मकता दाखवत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर खासदार सुळे यांनी इंदापूर शहरातील डॉक्टर वर्गांशी संवाद साधला यामध्ये प्रथम इंदापूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेला चार राज्यस्तरीय आणि एक देश पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल सुळे यांनी सर्व डॉक्टरांचे अभिनंदन केले. यावेळी डॉक्टरांच्या वतीने बायो मेडिकल वेस्ट त्याचप्रमाणे नवनवीन आरोग्य विषयक कायदे यासह इंदापूर तालुक्यात उजनीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत निर्माण होणाऱ्या समस्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढे मांडल्या.यावेळी आपल्या मागण्या रास्त असून या संदर्भात राज्य सरकार सह केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन सुळे यांनी डॉक्टर मंडळींना दिले.
What's Your Reaction?