सरडेवाडीतील जमदाडे वस्ती येथे घरफोडी ; ७ लाख ३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील जमदाडे वस्ती येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी केली असून यात तब्बल २ लाख रुपये रोख रक्कमेसह ५ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे असा एकूण ७ लाख ३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.या संदर्भात भालचंद्र तानाजी जमदाडे रा.जमदाडेवस्ती सरडेवाडी, इंदापूर, पुणे यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,त्यांच्या सरडेवाडी जमदाडे वस्ती येथे दोन स्लॅब च्या खोल्या व दोन पत्राच्या खोल्या आहेत. दि. 14 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजण्याचे सुमारास स्वत: फिर्यादी व त्यांची पत्नी, आई तिघेही नातलगाच्या अंत्यविधी करीता फोंडशिरस कदमवाडी ता. माळशिरस जि.सोलापुर येथे गेले होते.
जाताना त्यांनी त्यांच्या दोन मुली चुलत भाऊ गणेश वामन जमदाडे यांचे घरी सोडवल्या होत्या त्यावेळी वडील तानाजी जमदाडे हे घरी एकटेच होते. जाताना स्लॅबचे एका खोलीला कुलुप लावले होते व दुसरे खोलीत वडील तानाजी जमदाडे हे झोपले होते.
त्यानंतर दि.15 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याचे सुमारास चुलत भाऊ गणेश जमदाडे याचा फिर्यादी भालचंद्र जमदाडे यांना फोन आला. घराचे दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले असुन घरातील साहित्य अस्थाव्यस्त पडले असून घरी चोरी झाली आहे याची कल्पना त्याने दिली.
जमदाडे यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरामधील शोकेसचे कपाट उघडे दिसले, कपाटामध्ये सोन्याचे दागीने ठेवलेली बॅग व डब्बा दिसुन आला नाही.तसेच आईच्या आँपरेशनसाठी जमा केलेले पैसे कपाटामध्ये दिसुन आले नाहीत.याप्रमाणे इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.
What's Your Reaction?