ऊस का तोडला नाही म्हणत कारखान्याच्या संचालकाकडूनच कर्मचाऱ्याला मारहाण, अजित दादांच्या निर्णयाकडे लक्ष

Jan 30, 2025 - 18:35
Jan 30, 2025 - 18:36
 0  1813
ऊस का तोडला नाही म्हणत कारखान्याच्या संचालकाकडूनच कर्मचाऱ्याला मारहाण, अजित दादांच्या निर्णयाकडे लक्ष

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या फिल्डमनला त्याच कारखान्याच्या संचालकाने ऊसाला तोड का देत नाही ? या कारणातून शिवीगाळ करत ऊसाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सुरेश विरचंद भोईटे असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून तो छत्रपती सहकारी साखर कारखान्यात फील्डमन म्हणून काम करतो.

सुरेश भोईटे यांच्या तक्रारीवरून आता वालचंद नगर पोलीस ठाण्यात कारखान्याचे संचालक सर्जेराव शिवाजी जामदार यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना चालवला जातो.राज्यात ऊस गाळपाचा हंगाम चालू आहे शेतकऱ्यांच्या उसाला वेळेवर तोड मिळत नाहीत म्हणून शेतकरी देखील मेटाकुटीला आले आहेत.अशा वेळी कारखान्याचे संचालकच नियम धाब्यावर बसून ऊसाला थोडी मागत असतील आणि थेट कर्मचाऱ्यांनाच मारहाण करत असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जाब विचारायचा कोणाला ? असा प्रश्न उपस्थित झालाय त्यामुळे या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

तर या सर्व घडामोडीनंतर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळाला पाहिजे अशी मागणी विशाल मधुसुदन निंबाळकर यांनी कारखाना प्रशासनासह राज्याच्या साखर आयुक्तांकडे केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मिळालेल्या माहितीनुसार भोईटे हे गेल्या वीस वर्षापासून नोकरी करतात.दि.29 जानेवारी 2025 रोजी नेहमी प्रमाणे भोईटे घरातुन सकाळी 08:00 वाजता उसाच्या प्लॉटची पाहणी करण्याकरीता इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावात गेले होते. त्या ठिकाणी प्लॉट ची पाहणी करीत असताना त्यांना 10 वाजण्याच्या सुमारास मुख्य शेतकी अधिकारी जालींदर शिंदे यांचा फोन आला.त्यांनी भोईटे कोणत्या प्लॉटमध्ये आहेत याची माहिती घेतली. थोड्या वेळातच कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव शेतकरी जालिंदर शिंदे हे बेलवाडी पोहोचले त्यानंतर अशोक जाधव जालिंदर शिंदे आणि फिल्डमन सुरेश भोईटे हे कारखान्याचे संचालक सर्जेराव शिवाजी जामदार यांच्या उसाच्या प्लॉटची पाहणी करण्याकरता गेले. 

प्लॉटवर पाणी चालू असताना पाठिमागुन सर्जेराव शिवाजी जामदार व अजित हणुमंत घाडगे हे तेथे आले. यावेळी त्यांनी फिल्डमन भोईटे यांना अर्वाचे भाषेत शिवीगाळ केली. मी कारखान्याचा संचालक असुन देखील तु माझा ऊस का तोडला नाही असे म्हणून शिवीगाळ करुन भोईटे यांच्या डाव्या गालावर चापट मारली.

यावर भोईटे यांनी तुमचा ऊस तोडीचा नंबर येईल तेव्हा मी तुमचा ऊस तोडेल असे सांगितले. त्यावेळी सर्जेराव शिवाजी जामदार यांनी भोईटे यांच्या पाठीवर आणि डोक्यात उसाने मारहाण केली. तर अजित हणुमंत घाडगे याने शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. असं फिल्डमन भोईटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. पुढील तपास वाचन नगर पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow