इंदापुरातील धक्कादायक घटना, ऊसतोड कामगारांना नजर कैदेत ठेवणं मारहाण करणं पडलं महागात ! तिघांवर दाखल झाला गुन्हा

आय मिरर
ऊसतोड मजुरीसाठी आलेल्या बंद बिगार कामगारांना तब्बल सव्वा महिन्याहून अधिक काळ नजर कैदेत ठेवत त्यांना पायावर आणि नितंबावर काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील रेडा गावात घडला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जनसाहस या संस्थेच्या प्रयत्नातून आता या ऊसतोड मजुरांची अखेर सुटका झाली आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि तहसीलदार जीवन बनसुडे यांनी या मजुरांची सुटका करत याप्रकरणी आता इंदापूर पोलीस ठाण्यात संबंधित मुकादम आणि रेडा गावातील ट्रॅक्टर मालक संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे बंद बिगार मजूर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील असून ऊस तोडणीसाठी आले होते. मात्र त्याचा मुकादम त्यांना पैसे घेऊन येतो म्हणून गेला तो परत आलाच नाही.
मुकादम फरार झाल्याने देवकर यांनी या मजुरांना 11 फेब्रुवारी 2025 पासून ते 27 मार्च पर्यंत तब्बल सव्वा महिना हुन अधिक काळ नजर कैद केलं.यात 11 जोडप्यांसह व त्यांच्या कुटुंबातील लहान मुले मिळून अशा 41 जणांचा समावेश आहे.त्यांना नजर कैदेत ठेवत त्यांच्यावर अत्याचार केले मारहाण केली अशी तक्रार आता इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील जनसाहस या संस्थेला नजर कैदेत ठेवलेल्या या कामगारांबाबत हेल्पलाइन वरून माहिती मिळाली. त्यानंतर संस्थेचे जिल्हा समन्वयक राहुल खरात यांनी या कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. खरात यांनी ही संपूर्ण घटना संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातली आणि अखेर खरात यांच्या प्रयत्नांना यश आलं.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच प्रशासनक खडबडून जाग झालं.इंदापूर पोलिस आणि तहसीलदारांनी थेट रेडा गावं गाठल अन् कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत या कामगारांची सुटका केली. याप्रकरणी फरार मुकादम आणि नजर कैदेत ठेवत अत्याचार करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांवर मजूर विष्णू नारायण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये आणि बंद बिगार पद्धती अधिनियमानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला. असं असलं तरी इंदापुरात घडलेल्या या घटनेनंतर ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
What's Your Reaction?






