BARAMATI तो रस्त्यात स्टंट करत होता म्हणून पोलीस हवालदारानं हटकलं, त्याने थेट पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली ! हवालदार गंभीर जखमी

आय मिरर
रात्रीच्या वेळी रस्त्यात स्टंट करणाऱ्या वाहन चालकाला हटकले म्हणून बारामतीत एका पोलिस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे.या घटनेत बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गंभीर जखमी झाला आहे. संतोष दत्तू कांबळे असं या जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे.
या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ही दखल करण्यात आला आहे.जखमी पोलीस हवालदार कांबळे यांना बारामती मधील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये उपचार कामी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत.बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठान कडे जाणाऱ्या रस्त्यावर 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.कांबळे यांना रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी बारामती तालुका पोलिस ठाण्याचे चालक पोलिस शिपाई तरंगे यांचा फोन आला, ऐश्वर्या बेकरीच्या समोरच्या बाजूला एका काळया रंगाची, विना नंबर प्लेटची हुंडाई कंपनीची वेरना कार मधील चालक रस्त्यावरती आपल्या कारच्या माध्यमातून स्टंट करत आहे. त्यावर सरकारी वाहन घेऊन कांबळे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले.
बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठान कडे जाणाऱ्या रस्त्यावर ही गाडी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने लावली होती. कांबळे यांच्यासोबत पोलीस कर्मचारी गरुड आणि तरंगे हे देखील होते. यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी या गाडीची पाहणी केली त्यावेळी गाडीचे दरवाजे बंद होते गाडी लॉक होती.
पोलिसांनी ही गाडी कोणाची आहे याबाबतीत चौकशी सुरू केली असता एक 21 वर्षांचा युवक पोलिसांजवळ आला. त्याला विचारला असता त्याने नाव सांगितलं नाही. त्यावर कांबळे यांनी असा रस्त्यात स्टंट करून लोकांच्या जिवाच्या का खेळत आहात असा सवाल केला ? त्यावर त्याने मी तुला ओळखत नाही म्हणत अरेरावीची भाषा सुरु केली.
वाहतुकीस अडथळा होत असल्याने सदरील गाडी रस्त्याच्या बाजूला घेण्यास पोलिसांनी सांगितले. तू पोलिस स्टेशन ला चल,गाडी बाजूला नाही घेतली तर आम्हाला क्रेनने गाडी बाजूला काढावी लागेल असे सांगत पोलिस शिपाई तरंगे यांनी क्रेनला पाचारण केले. त्यावर या तरुणाने पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरवात केली.माझ्या नादी लागला तर एकेएकाला गाडीखाली घेऊन जीव मारेल अशी धमकी देत त्याने अचानक वाहनचालकाच्या सीटवर बसून गाडी सुरू केली. आणि जोरात गाडी मागे घेऊन उजव्या बाजूच्या डीकीने कांबळे यांना धडक दिली.
पहिल्यांदा तुझा जीव घेतो असं म्हणत कांबळे यांना जोरात त्याने ठोसाळलं, यात कांबळे डोक्यावर पाठीमागच्या बाजूला पडले. कांबळे जखमी झाले त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव वाहू लागला. कांबळे यांच्यासोबत असणाऱ्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या वाहनचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याच्या ताब्यातील हुंडाई गाडी समोरच्या बाजूने आणून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ही गाडी घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तो त्याची कार घेऊन फरार झाला.
What's Your Reaction?






