घराकडे जायला रस्ता नाही ! नातेवाईकांनी मृतदेह ठेवला शेळगाव येथील तलाठी कार्यालयासमोर ; वाचा नक्की काय घडलं
आय मिरर
शेतकऱ्याला दवाखान्यात न्यायला रस्ता नसल्याने व वेळेत वाहन न मिळाल्याने विलंब झाला. यातून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना इंदापूर तालुक्यात घडलीय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील विठ्ठल यशवंत माने (वय 58 वर्षे )असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत शेतकऱ्याचा मृतदेह थेट तलाठी कार्यालया समोर आणून ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेळगाव येथील तांबोळी जाधव वस्ती येथील विठ्ठल यशवंत माने या शेतकऱ्याच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही.गेले अनेक दिवस या संदर्भात कोर्ट कचेरीच्या चकरा चालू आहेत. माने या शेतकऱ्याला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नसल्याने चार चाकी आतपर्यंत येत नव्हती.रस्त्या पर्यंत पोहचण्यासाठी विलंब झाल्याने त्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
शिवाय अंत्यविधी करण्यासाठी देखील रस्ता नसल्याने माने यांच्या नातेवाईकांनी मृतदेह शेळगाव येथील तलाठी कार्यालयाचे समोर आणून ठेवला आहे. यामुळे नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान तहसीलदार व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून नातेवाईकांबरोबर चर्चा सुरू आहे.
महसूल विभागाने चर्चेतून काढला मार्ग…
दरम्यान तहसीलदार जीवन बनसोडे यांनी घटमास्थळी जाऊन नातलगांसोबत चर्चा केली असून सोमवारी आपण स्थळ पाहणी करून रस्त्याचा निर्णय देणार आहोत असं आश्वासन दिल्यानंतर विठ्ठल माने यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे.स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे.
What's Your Reaction?