कंपन्यामार्फत नोकर भरतीचा जीआर रद्द करा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार - महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा राज्य सरकारला इशारा
आय मिरर
राज्यात खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून नोकर भरती केली जाणार आहे. या संदर्भातील जीआर देखील शासनाने काढलेला आहे. एका बाजूला सरकार आरक्षणाचा विषय घेते दुसऱ्या बाजूला खाजगीकरण करते याचा अर्थ आरक्षण संपवल्यासारखं आहे. सरकारमध्ये जे आमदार आहेत त्यांच्याच या कंपन्या असून हुकूमशाही लादण्याचा हा प्रकार आहे. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिला आहे.
न्याय आणि हक्कासाठी मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन जर सरकार मोडीत काढणार असेल तर अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. राज्यातील सध्यस्थिती पाहता तात्काळ राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली आहे. ते इंदापूर मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
सोनवणे म्हणाले की,मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी घेऊन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी महिला पुरुषांसह आंदोलन सुरू होते आणि या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष पद्धतीने लाटी हल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीसारखं मराठा समाजाला अजूनही झुरवत ठेवू नये अशी विनंती ही आम्ही सरकारला करत आहोत. राज्य सरकारने नुसते आश्वासन देऊ नये तर न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या 600 ते 700 शाळा इतर कंपन्यांना चालवण्यासाठी दिल्या आहेत. हा जीआर देखील राज्य सरकारने रद्द करून या शाळा पूर्वीप्रमाणे राज्य सरकार मार्फत चालवण्यात याव्यात अशी मागणी ही सोनवणे यांनी केली आहे.
गायरान जमिनीवर राहण्यासाठी काही लोकांनी घरी बांधली आहेत.ती घरे काढण्याच्या हालचाली मध्यंतरी सुरू झाल्या होत्या.लोकांना राहण्यासाठी घरकुले मंजूर झाली आहेत,मात्र ती बांधण्यासाठी जागा नाही. त्यामुळे राज्य सरकारने ज्या ठिकाणी लोकांनी राहण्यासाठी कच्ची घरे बांधलेले आहेत त्या ठिकाणी पक्की घरे बांधण्यासाठी परवानगी द्यावी. प्रत्येक गावठाणा मध्ये लोकांनी केलेली अतिक्रमणे कायम करावीत. वनविभागाच्या वाटप करण्यात आलेल्या जमिनीचे प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लावावेत.
सोमवारी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचेही होणार आंदोलन
जनशक्ती शेतकरी संघटनेचे सोमवारी इंदापूर येथे खडी क्रेशर गौण खनिज प्रकरणावरून तहसील कार्यालयासमोर आंदोलन होणार असून याच दिवशी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष देखील आंदोलन करणार असल्याचा इशारा अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिला आहे.इंदापूर तालुक्यातील प्रशासन उत्कृष्ट काम करीत असून जर कोणी प्रशासनावर ताशेरे ओढणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असही सोनवणे यांनी सांगितले आहे.
What's Your Reaction?