इंदापूरात सुरु झाले राजकीय बदलाचे वारे,गंगावळणच्या सरपंच उपसरपंच यांसह चार सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश,म्हणाले "मामाचं लय भारी"

Jan 18, 2024 - 11:51
Jan 18, 2024 - 11:52
 0  2472
इंदापूरात सुरु झाले राजकीय बदलाचे वारे,गंगावळणच्या सरपंच उपसरपंच यांसह चार सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश,म्हणाले "मामाचं लय भारी"

आय मिरर

इंदापूर तालुक्यात लोकसभा आणि विधानसभेचे वारे जोरदार वाहु लागले असून हर्षवर्धन पाटील यांची हक्काची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या गंगावळण ग्रामपंचायच्या विद्यमान सरपंच निकिता प्रशांत गलांडे पाटील,उपसरपंच अभिजित विठ्ठल नलवडे, सदस्य रामहरी माणिक विपट,उज्वला रमेश जगताप,नंदा बाळासाहेब वाळुंजकर आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक प्रशांत गलांडे पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

यासोबतचं विठाबाई विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नितीन भारत पवार यांनी ही आमदार भरणे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना देखील हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, गंगावळण गावाचा पर्यटनात्मक विकास करण्यासाठी यापूर्वी आपण प्रचंड मदत केली आहे. आपल्याच माध्यमातून त्या ठिकाणी निधी आला आहे. जर कोणी त्यावरती दावा करत असेल विठाबाई देवी त्यांना बघून घे आणि मी खोटे बोलत असेल तर देवी मला बघून घेईल. भविष्यात देखील गंगावळणचा काळपट करण्यासाठी आपण हवा तेवढा निधी देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जुन्या आणि या नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन गावचा विकास करावा असे आवाहन भरणे यांनी केले.

माझं मूल माझी चूल सर्व माझंच होतं.…

पक्षप्रवेशानंतर भाजपा युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक प्रशांत गलांडे पाटील म्हणाले की, भरणे यांच्या कामाबाबत गेल्या दहा वर्षापासून मी प्रभावित आहे. ते निस्वार्थपणे काम करतात त्यांच्या पाठीमागे आपण असलं पाहिजे. ज्या पक्षात काम करत होतो तेथे मला वाईट अनुभव आले माझं मूल माझी चूल सर्व माझंच होतं. निष्ठावान कार्यकर्ता काम करत असेल तर त्याचा उपयोग होत नव्हता. कामापुरते फोन पाटीवर थापा मारायच्या आणि इकडे तिकडे पळचायचे गोड गोड बोलायचे एवढेच होत होतं. माझी पत्नी गावची सरपंच झाल्यापासून गावात गेल्या वर्षभरात एक रुपयाचाही निधी उपलब्ध झाला नाही. मी वेगळ्या पक्षात असूनही आमदार भरणे मला विकास निधी देत होते, गावातील थोरामोठ्यांसोबत आणि गावच्या सदस्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला. यापुढे गंगावळून मधून 70 टक्के मताधिक्य हे आमदार भरणे यांना असेल असा जाहीर शब्द यावेळी प्रशांत गलांडे पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट इरशीला पेटल्याचं पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यात ही अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळत असून बारामती लोकसभा मतदार संघात आपली पकड कायम ठेवण्यासाठी दौरे वाढवले आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा भाजप सेने सोबत सरकारमध्ये सहभागी झाला असला तरी इंदापूर तालुक्यात मात्र हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे हा संघर्ष अटळ आहे. त्याचेच पडसाद आता विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पाहायला मिळत असून गंगावळणच्या ग्रामपंचायत पासून फोडाफोडीच्या राजकारणाला तालुक्यात सुरुवात झाल्याचं पहायला मिळतेय.

विधानसभेच्या काठावर असणाऱ्या कुस्तीमध्ये आजी-माजी आमदारातील सत्ता संघर्षाचा हा कलगीतुरा निवडणुकीपर्यंत काय रंग आणणार ? कोण कुठे जाणार ? कोण कुठे येणार ? विजयाच्या गुलालाची उधळण कोण करणार? हे येणारा काळचं सांगेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow