मोठी बातमी || इंदापुरात आतापर्यंत आढळल्या 813 कुणबी मराठा नोंदी, अभिलेख शाखेत दप्तर तपासणीचे काम सुरू
आय मिरर
राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत कुणबी मराठा नोंदी करीता राज्यातील दप्तर तपासणीचं काम सुरू आहे. पुणे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी वैभव नावडकर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख शाखेत करण्यात आलेल्या दप्तर तपासणीत आतापर्यंत 813 कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत.
आत्तापर्यंत इंदापूर अभिलेख शाखेत 46733 एकूण नोंदी तपासण्यात आल्या असून त्यापैकी 813 नोंदी या कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत. 13 गावात मिळून 782 नोंदी या मोडी लिपीत तर 30 या मराठी भाषेत आढळून आल्या आहेत.एकूण 67 गावे असून त्यापैकी 13 गावे पूर्ण झाली असून 54 गावांची दप्तर तपासणी सुरु असल्याची माहिती अभिलेखापाल श्रीकांत जगताप यांनी दिली आहे.
प्रांताधिकारी वैभव नावडकर, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील,नायब तहसीलदार अनिल ठोंबरे,नायब तहसीलदार अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभिलेखापाल श्रीकांत जगताप यांसह इंदापूर अभिलेख शाखेतील सर्व कर्मचारी गेल्या काही दिवसापासून या नोंदी तपासणीचे काम करीत आहेत.या साठी वरिष्ठ कार्यालयातून दोन शासन मान्यताप्राप्त मोडी लिपी जाणकार तज्ञ देखील इंदापूर अभिलेख शाखेत दाखल झाले आहेत.ऐन दीपावलीच्या सणात देखील दप्तर तपासणीचं काम सुरू होते.
इंदापूर अभिलेख चे पथक कुणबी नोंदी करता शासकीय दप्तराची तपासणी करत आहे.1948 पूर्वी च्या व त्यानंतर च्या जन्म मृत्यूच्या मोडी व मराठा कुणबी नोंदी गांव नमुना नंबर 14 अंतर्गत तपासण्यात येत आहेत. आत्तापर्यंत इंदापूर महसूल अंतर्गत पाच गावात 813 कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
यात बावडा विभागात गणेशवाडी,कचरवाडी,सुरवड वकिलवस्ती,पिठेवाडी, लाखेवाडी आणि भोडणी या गावात मिळून जन्म मृत्यू नोंदी तपासण्यात येत आहेत. बावडा विभागात 15220 तपासण्यापैकी 18 नोंदी मोडी भाषेत आढळून आल्या आहेत.
तर पिंपरी खुर्द मध्ये एकूण 830 नोंदी पैकी 2 कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत. पुर्वीचे टाकळी गांव मधून 384 नोंदी पैकी 2 कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत.
तर सर्वाधिक नोंदी पळसदेव गावातून आढळून आल्या असून या गावा अंतर्गत माळेवाडी, बांडेवाडी आणि काळेवाडी १ व २ यात 7804 नोंदीपैकी मराठा कुणबी नोंदी 4, मोडी लिपीत 469 कुणबी मराठा अशा एकाच गावात 473 कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत.तर इंदापूर मधून तरंगवाडी, नरुटवाडी,गलांडवाडी १ व २, सरडेवाडी या सात गावातून 7144 तपासण्यातून 4 मोडी लिपीत कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत.यासह इतर काही गावांची तपासणी पूर्ण झाली असून आत्तापर्यंत 46733 एकूण नोंदी तपासण्यात आल्या असून त्यापैकी 813 नोंदी या कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत.
What's Your Reaction?