इंदापूर तालुक्यासाठी निरा डावा व खडकवासला कालव्यातून रब्बीसाठी सोडली जाणार 2 आवर्तने - हर्षवर्धन पाटील यांची माहिती

Oct 20, 2023 - 13:57
 0  2405
इंदापूर तालुक्यासाठी निरा डावा व खडकवासला कालव्यातून रब्बीसाठी सोडली जाणार 2 आवर्तने - हर्षवर्धन पाटील यांची माहिती

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी निरा डावा कालवा व खडकवासला कालवा या मधून रब्बीसाठी प्रत्येकी 2 आवर्तने सोडण्यात येणार आहेत. सणसर कट मधून 1.40 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतीला मिळणार आहे. तसेच शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरून घेण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शुक्रवारी (दि.20) यांनी दिली.

पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अनेक मागण्या केल्या. या मागण्या संदर्भात झालेल्या निर्णयांची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.            

हर्षवर्धन पाटीलपुढे म्हणाले, येत्या 10 नोव्हेंबर पासून निरा डावा कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन सुरू होईल. तसेच शेटफळ तलाव सध्या 50 टक्के भरलेला असून, पाठीमागील कालवा सल्लागार समितीमध्ये झालेल्या चर्चे प्रमाणे 100 टक्के क्षमतेने तलाव भरून देण्यात यावा, अशी मागणी बैठकीत केली, त्यावर या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे नमूद करण्यात आले आहे. तसेच निरा डावा कालव्यामधून वरकुटे खुर्द, तरंगवाडी, झगडेवाडी, वाघाळा टॅंक, वालचंदनगरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घोलपवाडी नळ पाणी योजना पिण्याचा पाणी प्रश्न या सर्व ठिकाणी आगामी पावसाळी येईपर्यंत पाणी देण्याची व्यवस्था झाली पाहिजे, अशी मागणी बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.        

इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून 28 फेब्रुवारीपर्यंत 2 आवर्तने मिळणार आहेत. त्यानंतर उन्हाळ्यात इंदापूर तालुक्याला पाणी न देण्याचा टिप्पणी होती. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्यावरील मदनवाडी ते तरंगवाडी दरम्यानच्या 18 पाझर तलावांसाठी उन्हाळ्यात 2 टीएमसी पाण्याची मागणी बैठकीत केली. त्यावर पालकमंत्री अजितदादा पवार यांनी महानगरपालिका आयुक्तांची चर्चा करून पाण्याचे फेरवाटप करण्याचा निर्णय घ्या,असे नमूद केले. तसेच तरंगवाडी तलावातून इंदापूर शहराला पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे, अशी मागणी बैठकीत केली. तसेच उजनीतील पाणी प्रदूषित झाल्याने मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे उजनी पाणी शुद्धीकरण प्रकल्प आराखडा राबवावा तसेच उजनी मध्ये मत्स्य बीज सोडून मत्स्य व्यवसाय वाढवावा, अशी सूचना बैठकीत मी केली. या सर्व मागण्यावर बैठकीस सकारात्मक चर्चा झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

सणसर कट मधून पाण्याच्या मागणीला यश - सणसर कटच्या प्रकल्प अहवालामध्ये 3.70 टीएमसी पाणी देण्याची तरतूद आहे. मात्र गेली 9 वर्षांपासून सणसर कट मधून एक थेंबही पाणी आले नाही. त्यामुळे सणसर कट मधून हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी सातत्याने केली. आजच्या बैठकीमध्ये सणसर कट मधून 1.40 टीएमसी पाणी नीरा डावा कालवा लाभ क्षेत्रासाठी देण्याचा निर्णय करून घेतला. त्यामुळे 22 गावांमधील शेतीलाही फायदा होणार आहे अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow