शेतकऱ्यांचे विद्युत मोटार पंप व केबल चोरणारे दोन जेरबंद, ८ गुन्हे उघड - सुपा पोलीसांची कारवाई
आय मिरर
बारामती तालुक्यातील शेरेवाडी, बाबुर्डी, मोरगाव, सुपेसह अन्य परिसरातून शेतकऱ्यांचे विद्युत मोटार पंप व केबल चोरणाऱ्या दोघांना सुपा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुपा पोलीस स्टेशन कडील एकुण ०८ गुन्हे उघड करीत अटक करण्यात आलेल्या दोघांकडून ०१ मोटार सायकल, ०६ विद्युत मोटार पंप व ६१५ फुट तांब्याची केबल असा एकुण १ लाख ६८ हजार ७३८ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार,दिनांक १६ आँक्टोंबर २०२३ रोजी रात्री रात्रगस्त करीता पो. हवा भाग्यवंत, होमगार्ड खोमणे, होमगार्ड मोरे यांना घेऊन मार्गस्थ झालो. याच वेळी शेरेवाड़ी परिसरात रात्रगस्त करीत असताना एक संशयित विना नंबरची ज्युपीटर स्कुटी मोटार सायकल भरधाव वेगाने शेरेवाडी, लोणी पाटी मार्गे तरडोली गावाचे दिशेने गेली.
सदर गाडीचा पाठलाग करून संशयित मोटार सायकल थांबवुन मोटार सायकलवरील सुनिल हनुमंत रेवडे वय ३० वर्षे रा. शेरेवाडी ता. बारामती जि. पुणे आणि विश्वनाथ श्रीरंग कांबळे वय ३२ वर्षे रा. तरडोली ता. बारमाती जि. पुणे यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ हातोडे, २ एक्सपाने, १ एक्सा ब्लेड मिळुन आले.
त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी शेरेवाडी, बाबुर्डी, मोरगाव, सुपे, पानसरेवाडी व काळखैरेवाडी या गावचे परिसरातील शेतक-यांचे ६ विद्युत मोटार पंप, व ५ ठिकाणचे ६१५ फुट तांब्याची केबल चोरलेचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले.दाखल गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा १८४३ राहुल भाग्यवंत व पो. हवा रूपेश साळुंखे करीत आहेत.
What's Your Reaction?