मोठी बातमी ! माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा

आय मिरर
आपल्या कारकिर्दीत उसाला सर्वाधिक उच्चांकी ३४११ रुपये प्रतिटन असा दर देणारे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी वैयक्तिक अडचणीमुळे पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तावरे यांनी राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. बाळासाहेब तावरे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जवळपास १५ ते १६ वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखालील सत्ता स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब तावरे यांना अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. त्यावेळी त्यांची नियुक्ती काही कालावधीसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला केवळ दीड वर्ष कालावधी शिल्लक असताना अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा दिल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे, तर यापुढील अध्यक्ष कोण? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. माळेगाव साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ॲड. केशवराव जगताप, सुरेश खलाटे, योगेश जगताप, मदननाना देवकाते आदींची नावे अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उपाध्यक्ष जाधव यांचाही राजीनामा
माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच कारखान्याचे उपाध्यक्ष असलेले सागर जाधव यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
इतिहासातील उच्चांकी ऊसदर
माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी गाळप हंगाम सन 2022- 23 मधील तुटून आलेल्या उसाला प्रतिटन ३४११ रुपये हा ऊस दर दिला. माळेगाव साखर कारखान्याच्या इतिहासातील हा उच्चांकी उस दर असल्याचे मानले जाते.
"माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात सातत्याने संस्थेच्या हीताचा निर्णय घेतला. तसेच ऊस उत्पादक शेतकरी सभासद, अधिकारी, कामगार यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. खासदार शरद पवार तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव साखर कारखान्याची ओळख राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. या संपूर्ण प्रवासात कारखान्याचे समकालीन उपाध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालक तसेच ऊस उत्पादक शेतकरी सभासद, अधिकारी, कामगार यांनी मोलाचे सहकार्य दिले याबद्दल त्यांचा मी कायम ऋणी राहील" - बाळासाहेब तावरे,अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना
What's Your Reaction?






