घरातील 'लाडकी' म्हणून तिचं अस्तित्व होतं,आता फक्त उरलीय अवयव रुपात ! तिची मृत्यूशी झुंज अपयशी

Dec 21, 2024 - 11:00
Dec 21, 2024 - 11:00
 0  1884
घरातील 'लाडकी' म्हणून तिचं अस्तित्व होतं,आता फक्त उरलीय अवयव रुपात ! तिची मृत्यूशी झुंज अपयशी

आय मिरर (निलेश मोरे) 

घरातील अतिशय लाडकी कन्या म्हणून तिचं अस्तित्व होतं. ती धाडसी होती. त्यामुळेच ती वैमानिक होण्यासाठी बारामतीत आली होती. मात्र, उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचं अपघातात निधन झालं. 

परंतु, तिच्या स्मृती कायमस्वरूपी राहाव्यात म्हणून कुटुंबीयांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.आठ दिवसांनी जगण्याची लढाई संपली; तरी हृदय, डोळे, किडनी यांसह आठ अवयव दान करण्यात आले. कुटुंबीयांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बारामतीतील पायलट ट्रेनिंग संस्थेत शिकणारे कृष्णाशू मंगल सिंग, दक्षु विष्णू शर्मा, चेश्ता ज्योतीप्रकाश बिष्णोई व आदित्य जयदास कणसे हे चौघेजण भिगवण (ता. इंदापूर) उजनी पाणवठ्यावर ९ डिसेंबरच्या पहाटे तीनच्या दरम्यान निघाले होते. कृष्णाशू हा गाडी चालवत होता.त्याच्या शेजारी दक्षु शर्मा तर पाठीमागे चेश्ता व आदित्य बसले होते.

गाडी जैनकवाडी (ता. बारामती) येथील घाटाच्या पहिल्या वळणावर आली, तेव्हा कृष्णाशू याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी अगोदर रस्त्याकडेच्या झाडाला धडकून लोखंडी पाइपलाइनवर पलटी झाली.या भरधाव जाणाऱ्या गाडीचा वेग तब्बल १९० किलोमीटर ताशी होता असे तपासात निष्पन्न झाले.

हा अपघात एवढा भीषण होता की, गाडी तब्बल १४० फूट अंतरापर्यंत घासत गेली. यामध्ये आदित्य कणसे व दक्ष शर्मा हे दोघे जागीच मृत झाले. तर, चेश्ता व कृष्णाशु जखमी झाले.चेश्ता गंभीर जखमी झाल्याने हिला पुण्यातील रुबी हॉल या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचारादरम्यान आठ दिवसांनंतर मंगळवारी (दि. १७) मृत्यू झाला. 

दरम्यान, जखमी कृष्णाशु हा उपचारातून बरा झाला असून त्याला दवाखान्यातून सोडण्यात आले आहे.

राजस्थानमधल्या ज्योतीप्रकाश बिश्नोई या व्यावसायिकाची चेश्ता ही कन्या होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यामध्ये चेश्ता ही त्यांची लाडकी होती.ती शिक्षणासाठी बारामतीत आली होती.अपघातात तिचा ब्रेन डेड झाल्याने उपचारास प्रतिसाद देत नसल्याने पालकांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

यामध्ये हृदय, किडनी, डोळे यांसह आठ अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी तिला सहकाऱ्यांनी जड अंतःकरणाने निरोप दिला.ती धाडसी होती. ती नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी अग्रेसर असल्याची भावना तिच्या प्रशिक्षकांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow