आजपासून भिगवण येथे 'राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला'
आय मिरर(देवा राखुंडे)
मराठा महासंघ भिगवण शाखा व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवानिमित्त राजमाता जिजाऊ व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर व भिगवण शाखाध्यक्ष छगन वाळके भिगवण शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली.
व्याख्यानमालेचे हे २३ वे वर्ष असून समाज प्रबोधन व त्यातून समाज परिवर्तनाचा वसा जपणारी महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यानमाला म्हणून या व्याख्यानमालेकडे पाहिले जाते.१४ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान भिगवण येथील जुन्या शिवरत्न मंगल कार्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या या व्याख्यानमालेत उत्कृष्ट व दर्जेदार वक्त्यांची अखंडित परंपरा याही वर्षी चालू ठेवण्यात आली असून अकोला येथील कवी अनंत राऊत हे 'कवी मनाच्या सामाजिक भावना' या विषयावर, पुणे येथील ममता सपकाळ ह्या 'माय..., ही मायच असते!' या विषयावर, बारामती येथील चांडाळ चौकडी वेब सिरीजचे भरत महाराज शिंदे हे 'चला..., संस्कार मूल्य जपूया....!' या विषयावर, सारथीचे डॉ. विलास पाटील हे 'शिक्षण म्हणजे सुखी जीवनाचा मूलमंत्र' या विषयावर तर राष्ट्र सेवादल पुणेचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष वारे हे 'बाबासाहेब सर्वांचे' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांचे हस्ते आणि अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या "पुढचे पाऊल" या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन होत असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
व्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्पाचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे भिगवणच्या सरपंच दीपिका क्षीरसागर, बारामती येथील वैद्यकीय सल्लागार डॉ. कीर्ती पवार, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर व बारामती येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर हे उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेचा समारोप पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक बापूसाहेब खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.
What's Your Reaction?