'अजूनही वेळ गेली नाही', अजित पवार गटातील आमदारांना रोहित पवारांचा अल्टीमेटम

Sep 6, 2023 - 14:42
 0  893
'अजूनही वेळ गेली नाही', अजित पवार गटातील आमदारांना रोहित पवारांचा अल्टीमेटम

आय मिरर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदार अजित पवार गटात सामील झाल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाकडे नेमका आकडा किती आहे? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटातील काही नेत्यांकडून विविध बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो लावला जात आहे.

याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे. तरीही काही आमदारांकडून शरद पवारांचा फोटो वापरला जात आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अजित पवार गटाकडून फोटो वापरण्याबाबत शरद पवारांनी वक्तव्य केलं आहे. ज्या ठिकाणी अजित पवार गटाच्या मोठ्या सभा होतात, तिथून त्यांनी शरद पवारांचा फोटो वापरणं बंद केलं आहे. पण आमदारांना माहीत आहे, शरद पवारांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. त्यामुळे त्या-त्या आमदारांकडून स्थानिक स्तरावर फोटो लावला असावा. ज्यांना पदं मिळाली, ज्यांना मंत्रिपदं मिळाली, जे आज सत्तेत आहेत, ते कदाचित शरद पवारांना विसरले असतील. पण अनेक आमदार अजून शरद पवारांना विसरले नाहीत. अजूनही वेळ गेली नाही”, असं सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत रोहित पवार पुढे म्हणाले, “सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच अध्यक्ष आहेत, ते म्हणजे शरद पवार. आता अजित पवार गटाला निवडणूक आयोगाबाबत आत्मविश्वास आहे, त्यांना वाटतं की निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे, ते बरोबरच आहे. निवडणूक आयोग त्यांच्या बाजुने निर्णयही देईल. पण सर्वोच्च न्यायालय अजूनही न्यायाच्या बाजुने म्हणजेच आमच्या बाजुने आहे.”

“आमचा लढा मोठा आहे. आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह असलं काय आणि नसलं काय. आमच्याकडे पवारसाहेब आहेत. शरद पवारांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर आणि लोकांना विश्वासात घेऊन आम्ही आमचा लढा लढू. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांचा अहंकार आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही”, असंही रोहित पवार म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow