सासवड येथे कॅन्डल मार्च काढत नोंदवला संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध

आय मिरर (राहुल शिंदे)
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कॅण्डल मार्च काळात निषेध नोंदवण्यात आलाय. त्याचबरोबर परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांच्या हत्येचा ही सासवड करांकडून निषेध करण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करत सासवड येथील शिवतीर्थावर एकत्र येत ग्रामस्थांनी आरोपींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
यावेळी अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे अशी घोषणाबाजी करण्यात आली. तर आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी ही करण्यात आली.
9 मार्च 2025 रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले. सीआयडीने या प्रकरणात वाल्मीक कराडला मुख्य आरोपी केले आहे. तर याच प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत.गेले तीन महिने देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
9 मार्च 2025 रोजी याच पार्श्वभूमीवर राजकारणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीत लक्षवेधी असा निषेध मोर्चा झाला. या मोर्चात धनंजय देशमुख वैभवी देशमुख यासह देशमुख कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते.
यावेळी बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी काही सवाल केले. बीडचं पालकमंत्री पद तुमच्याकडे आहे जेव्हा तुम्ही बीडला याल त्यावेळी कागदपत्रांची पाहणी करा आणि सत्य परिस्थिती जाणून घ्या. आम्ही न्यायाची भीक मागत आहोत आणि त्यासाठी तुमच्या बारामतीत आलो आहोत. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे परंतु अजित दादा तुम्ही या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचा तेव्हा तुम्हाला धक्कादायक खुलासे होतील, यासाठी या प्रकरणाचा खोलवर तपास करा असं आवाहन धनंजय देशमुख यांनी केले.
तर अजित पवार तुमचा पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चालल आहे आणि तुम्ही त्याला पाठीशी घालत आहात असं म्हणत वैभवी देशमुख हिने अजित पवारांवर तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. दरम्यान या प्रकरणाचा खोलवर तपास झाला पाहिजे. माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतून झाली. ही खंडणी नेमकी कोणाला जात होती याचा तपास अजितददांनी करावा अशी मागणी वैभवी देशमुख हिने केली.
एकूणच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारमाध्यम आणि सोशल माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला आहे. गावोगावी निषेध आंदोलने होत असून आरोपींना फाशीची मागणी केली जात आहे. तर या प्रकरणात धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
What's Your Reaction?






