कुठे काका-पुतण्या, कुठे गुरु-शिष्य आमनेसामने,५२ पैकी ३५ जागांवर अजित दादांपुढे थेट शरद पवारांचं आव्हान 

Oct 31, 2024 - 10:32
Oct 31, 2024 - 10:35
 0  229
कुठे काका-पुतण्या, कुठे गुरु-शिष्य आमनेसामने,५२ पैकी ३५ जागांवर अजित दादांपुढे थेट शरद पवारांचं आव्हान 

आय मिरर

राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक सामने पाहायला मिळणार असून त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या थेट सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पक्षात उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षात ३५ मतदारसंघांत थेट लढत होणार आहे.

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. २०१९ मध्ये निवडून आलेल्या आमदारांपैकी अजित पवार यांच्या पाठीशी ४१ आमदार उभे राहिले होते.तर उरलेले आमदार शरद पवार यांच्यासोबतच गेले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले.

त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात शरद पवार यांच्याच पक्षाने बाजी मारली.

विधानसभा निवडणुकीत पवार यांनी महाविकास आघाडीतून ८७ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या तर अजित पवार यांच्या पक्षाला ५२ जागाच मिळाल्या आहेत. यातील एकूण ३५ जागांवर दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. 

यातील बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील, कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीतसिंह घाटगे, कळवा-मुंब्रामध्ये नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांसारख्या लक्षणीय लढती होणार आहेत. 

जागावाटपात केवळ १३ आमदार हाताशी असूनही शरद पवार यांनी एकूण ८७ उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत. यात भाजप तसेच इतर पक्षातून प्रवेश केलेल्या नेत्यांचीही संख्या आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पाठीशी ४१ आमदार असूनही त्यांना फक्त ५२ जागाच मिळवता आल्यात.

या जागांवर थेट लढत…

बारामती, इंदापूर, आंबेगाव, अहेरी, कागल, कळवा-मुंब्रा, हडपसर, वसमत, वडगाव शेरी, चिपळुण, शिरुर, तासगाव कवठे महांकाळ, इस्लामपूर, उदगीर, कोपरगाव, अणुशक्ती नगर, येवला, परळी, दिंडोरी, श्रीवर्धन, माजलगाव, वाई, सिन्नर, अहमदनगर शहर, अहमदपूर, शहापूर, पिंपरी, अकोले, जुन्नर, मोहोळ, देवळाली, चंदगड, तुमसर, पुसद, पारनेर

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow