धक्कादायक ! बापानेच दिली मुलाला मारण्याची सुपारी...70 हजारांत दोघांनी केला खून

Sep 29, 2023 - 21:45
 0  2502
धक्कादायक ! बापानेच दिली मुलाला मारण्याची सुपारी...70 हजारांत दोघांनी केला खून

आय मिरर

दारू पिऊन आई-वडील व कुटुंबियांना त्रास देत असल्याने वडिलांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातीलच दोघांना 70 हजारांची सुपारी देऊन मुलाचा खून केल्याची घटना बुधवारी (दि. 27) रोजी उघडकीस आल्याने सिन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.राहुल शिवाजी आव्हाड (30) असे मृत मुलाचे नाव आहे. 

बुधवारी (दि. 27) दुपारच्या सुमारास पास्ते ते हरसुले रस्त्यावर बंद पडलेल्या कालिया कंपनीच्या आवारातील मीटर रूममध्ये राहुलचा मृतदेह आढळून आला. परिसरातील शंकर कातकाडे यांनी हे बघितले असता त्यांनी तात्काळ गावात याबाबत माहिती दिली.

सिन्नर पोलिसांना याबाबत कळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राहुलच्या तोंडातून फेस निघत होता. नागरिकांच्या मदतीने राहुलला तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र, राहुलने आत्महत्या केली की खून याबाबत खुलासा होत नसल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले.

राहुलच्या शवविच्छेदनाच्या अहवालात राहुलचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांनतर त्याच्या तोंडात विषारी औषधही टाकण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. यासाठी पोलिसांकडून राहुलच्या कुटुंबातील सदस्यांना व ग्रामस्थांकडे राहुल बाबत चौकशी केली. यावेळी पोलिसांना राहुल हा पिण्याच्या आहारी गेला होता व तो आपल्या आई-वडिलांना त्रास देत असल्याचे कळून आले.

तसेच तो गावातील नागरिकांही त्रास देत असल्याने आई-वडिलांना मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय कुटुंबातील सदस्यांवर बळावला. यासाठी राहुलचे वडील शिवाजी विश्वनाथ आव्हाड (50) यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातील वसंत अंबादास आव्हाड (40) व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (43) या दोघांना 70 हजार रुपये देण्याचे कबूल करत सुपारी दिली.

त्यानंतर वसंत व विकास या दोघांनी रात्रीच्यावेळी राहुलला एकांतात गाठत त्यास हरसूले रस्त्यावरील बंद पडलेल्या कंपनीत घेऊन गेले. तेथे त्यांनी राहुलचा गळा दाबून त्याचा खून केला. राहुलने स्वतःच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली असे वाटावे म्हणून दोघांनी त्याच्या तोंडात विषारी औषध टाकून त्यास कंपनीतील मीटर रूममध्ये टाकून दिल्याची दोघांनी कबूली दिली.

याप्रकरणी पोलिसांनी राहुलचे वडील शिवाजी आव्हाड, वसंत आव्हाड व विकास कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोठाळे करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow