बिग ब्रेकिंग | भिगवण मध्ये रस्त्यावर उघड्यावर फेकला मुदत बाह्य औषधांचा साठा ; उडाली एकचं खळबळ

Jan 10, 2024 - 07:21
Jan 10, 2024 - 07:33
 0  89
बिग ब्रेकिंग | भिगवण मध्ये रस्त्यावर उघड्यावर फेकला मुदत बाह्य औषधांचा साठा ; उडाली एकचं खळबळ

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

भिगवण मधील बायपास रोड लगत महावितरणच्या कार्यालयापसून अगदी जवळचं मुदत बाह्य औषधांचा मोठा साठा रस्त्यावर फेकून दिलेल्या अवस्थेत सोमवारी दि.०८ जानेवारी दुपारी आढळून आल्याने भिगवण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

मागील काही दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यातील निमसाखर पट्टयात आणि पुणे सोलापूर महामार्गावरील बिजवडी परिसरातील वनविभागाच्या माळरानावर देखील असा मुदतबाह्य औषधांचा साठा फेकून दिलेल्या अवस्थेत निदर्शनास आला होता. आता पुन्हा एकदा असाच प्रकार इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.इंदापूर तालुक्यात वारंवार असे प्रकार घडत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भिगवण मधील बायपास रोड लगत महावितरण च्या कार्यालयापसून अगदी जवळचं रस्त्यावर हा मुदतबाह्य औषधांचा साठा पडल्याच स्थानिक पत्रकारांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची कल्पना त्यांनी भिगवण पोलिस आणि आरोग्य विभागास दिली.त्यानंतर पंचनामा करुन तो साठा पोलीसांनी हस्तगत केला आहे. 

फेकून दिलेली औषधे ही वापराच्या बाहेर गेली आहेत. जनावरांच्या खाण्यात संपर्कात आल्यास किंवा एखाद्या मनुष्याने खाल्यास यापासून त्यांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो असं वैद्यकिय तज्ञांच मत आहे.हा साठा भिगवण पोलीसांनी जप्त केला असून आता अन्न व औषध प्रशासन विभाग यावर कोणती कारवाई करणार? साठा कोणी टाकला? त्याचा शोध लागणार का?असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. 

दरम्यान या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुरेखा पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की,हा साठा खाजगी औषध विक्रेत्याचा असून महाराष्ट्र शासनाचा नाही.कारवाई चालू आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाला पुढील योग्य त्या कारवाईसाठी आमच्या कार्यालयाकडून कळवणार आहोत.यासोबतच इंदापूर तालुक्यात घडणारे भविष्यातील असे प्रकार टाळण्यासाठी शहरासह तालुक्यातील खाजगी रुग्णालय चालकांना देखील आम्ही सूचना करणार आहोत यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरच्या अध्यक्षांशी पत्रव्यवहार करून खाजगी रुग्णालयाचे बायोमेडिकल वेस्ट हे त्या त्या रुग्णालयाने निमावलीनुसार विल्हेवाट लावण्याबाबत सूचनाही करणार आहोत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow