बिग ब्रेकिंग : पुणे सोलापूरकरांची जिवनदायणी असणारी उजनी जानेवारीतचं मायनसमध्ये १० वर्षांत पहिल्यांदाच अशी स्थिती ..तर परिस्थिती गंभीर

Jan 22, 2024 - 06:34
 0  310
बिग ब्रेकिंग : पुणे सोलापूरकरांची जिवनदायणी असणारी उजनी जानेवारीतचं मायनसमध्ये १० वर्षांत पहिल्यांदाच अशी स्थिती ..तर परिस्थिती गंभीर

आय मिरर (देवा राखुंडे)

सोलापूरसह पुणे (इंदापूर व बारामती), नगर, धाराशिव या शहरांसाठी वरदायिनी असलेल्या उजनीतील पाणीसाठा रविवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहा वाजता उणे झाला आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दहा वर्षानंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. धरणातील साठा ६० टक्के उणे झाल्यानंतर उजनीवरील बहुतेक पाणीपुरवठा योजना बंद पडतात, त्यामुळे आता प्रशासनाला पाण्याचे ठोस नियोजन करावे लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वच एमआयडीसींना तर पुणे जिल्ह्यातील काही एमआयडीसींना उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. कर्जत- जामखेड, धाराशिव, सोलापूर, इंदापूर, बारामती शहरासह सोलापूर जिल्ह्यातील १००हून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पावणेदोन लाख हेक्टर जमीन उजनीमुळे सिंचनाखाली आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीला उजनीचा मोठा आधार आहे. आता जानेवारीतच उजनी धरण मायनस झाल्याने आगामी साखर हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होणार हे निश्चित. पुढच्या वर्षी सुपर अलनिनो वादळामुळे पावसाळा काही दिवस लांबणीवर पडू शकतो, असा हवामान खात्याचा पूर्वीचाच अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला उजनीतील पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागेल, अन्यथा पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पाणीसाठा अन्‌ पाणीपुरवठा योजनांची स्थिती

कॅनॉल : उणे ३२.३३ टक्के

बोगदा : उणे २१ टक्के

‘सीना-माढा’ योजना : ०० टक्के

दहिगाव योजना : उणे २.९६ टक्के

सोलापूर शहर : उणे ५५.८८ टक्के

धाराशिव योजना : उणे ६१.७४ टक्के

६३.६६ टीएमसी मृतसाठ्यात १८ टीएमसी गाळ

पावसाळा संपल्यापासून तीन महिन्यात उजनीतील तब्बल ६६ टक्के पाणीसाठा संपला आहे. दरम्यान, धरणातील ६३.६६ मृतसाठ्यात तब्बल १८ टीएमसीपर्यंत गाळच आहे. दुसरीकडे राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निकषांनुसार धरणात काही प्रमाणात राखीव साठा ठेवणे बंधनकारक आहे. यंदा धरण उणे ६० टक्के खाली जाईल, यादृष्टीने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. १५ फेब्रुवारीला शेतीसाठी सोडलेले पाणी बंद होईल. त्यानंतर धरणातील संपूर्ण पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे धरण उणे ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत खाली जाईल, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow