ऐन हिवाळ्यातच उजनी आली बत्तीस टक्क्यांवर - नियोजनाची गरज

Nov 27, 2023 - 16:34
 0  769
ऐन हिवाळ्यातच उजनी आली बत्तीस टक्क्यांवर - नियोजनाची गरज

आय मिरर

ऐन हिवाळ्यातच उजनी धरणाच्या पाण्याची पातळीत मोठी घट झाली आहे.उजनी धरण 32 टक्क्यावर आले आहे. सध्या उजनी मध्ये केवळ 17.60 टीएमसी पाणी चलसाठा असून याच पद्धतीने पाण्याचा वापर झाला तर ,जानेवारी महिन्यातच धरण मोकळे होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून , आहे ह्या पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास मोठ्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे .याचे चित्र आता स्पष्ट दिसत आहे.

यावर्षी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. परतीच्या पावसात उजनी मध्ये केवळ 60 टक्के पाणीसाठा जमा झाला.यातूनच रब्बी हंगामाचे आवर्तन व भीमा सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्याबरोबरच कार्तिकी एकादशीनिमित्त नदीपात्रातून पंढरपूरला पाणी सोडण्यात आल्यामुळे या आठवड्यात पाणी साठ्यात कमालीची घट होत पाणीसाठा 32 टक्के वर आला आहे.

मागील पावसाळ्यात उजनी धरण शंभर टक्के भरले होते. उजनीच्या पाणलोट व लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापर्यंत उजनी धरण काठोकाठ भरले होते. 100 टक्के पाणी साठा जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध होता .मात्र, जानेवारीनंतर उजनीचा पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्याने उन्हाळा अखेरपर्यंत उजनी धरण 100 टक्के खाली होऊन मृतसाठ्यातीलही 36 टक्के पाणी वापरत आल्याने उजनी धरण मोकळे झाले होते. 

अशातच पावसानं दडी मारल्यामुळे उजनी धरणामध्ये उशिराने पाणी साठण्यास प्रारंभ झाला. मात्र पाणीसाठा पूर्ववत होत बराच अवधी लागल्याने उजनी धरण केवळ 60 टक्केच भरले. या 60 टक्के मधून 25 टक्के पाणी दीड महिन्यात वापरात आल्याने आगामी हिवाळा व पुढील वर्षीचा भीषण उन्हाळा बत्तीस टक्के पाण्यामध्ये निभावणार का ? याचे उत्तर आज कोणाकडेच नाही. 

आता उजनीच्या पाण्याचा सुरुवातीपासूनच मोठा वापर सुरू झाला असल्याने दुष्काळाच्या खाईत उजनी धरणावर अवलंबून असलेल्या लोकांची वनवन सुरू झाल्यानंतर ऐनवेळी शासन नेमकी कोणती उपाययोजना करणार? याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

वीस वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळात खडकवासला धरणातून दहा टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये सोडण्यात आले होते. मात्र सध्या खडकवासला धरणावर अवलंबून असलेल्या शेतीच्या पाण्याच्या आवर्तनातच मोठी तफावत आढळून येत असून, पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा दररोजच वाढत असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये खडकवासला धरणाचे पाणी शेतीसाठी व ऐनवेळी उजनी धरणामध्ये सोडण्यासाठी कितपत मिळू शकेल याबाबत शंका व्यक्त होत आहे.

उजनी धरणाच्या पाण्याची स्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच उजनीच्या पाण्याच्या वापराबाबत अत्यंत जबाबदारी घेऊन काटेकोरपणे पाणी वापरण्याची वेळ आलेली असताना बेसुमार पाण्याचा वापर या बिकट परिस्थितीमध्ये परवडण्यासारखा नसून उजनीच्या पाण्यावर पाणलोट क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर ची शेती सह पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत.

अनेक सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखाने, औद्योगिक वसाहतींनाही उजनीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने या पाण्याचाही उजनीच्या पाण्याचे नियोजन करताना विचार होणे गरजेचे आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow