ग्रामीण भागातील रग्णांसाठी इंदापूरचा डॉ.अनिकेत जगताप होणार कॅन्सर स्पेशालिस्ट
आय मिरर
डॉक्टर होऊन गरीब रुग्णांना मदत करायची. या स्वप्नासाठी त्याने खूप मेहनत केली. अभ्यासात कधीच कसर सोडली नाही. शेवटी, त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. ऑन्कोलॉजीसाठी INICET 2023 (AIIMS) सुपरस्पेशालिटी परीक्षेत संपूर्ण देशात AIR -04 मिळवून त्याने दैदिप्यमान यश मिळवले.
मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कालठण नं १ चे रहिवासी डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप यांनी हे यश मिळवले असून तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्याचे वडील पी.डी.सी.सी बँकेत ब्राँच मॅनेजर आहेत तर आई गृहिणी.
अनिकेत यांचे शिक्षण सुरुवातीला इंदापूर येथील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत झाले. त्यानंतर, त्याने सायन हॉस्पिटल, मुंबई येथून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. पदविकासाठी एम डी मेडिसिन साठी त्याने सफदरजंग मेडिकल कॉलेज, दिल्ली येथे प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये असताना त्यांनी कॅन्सर स्पेशालिटीमध्ये रस घेतला आणि त्यात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. अनिकेत यांचे म्हणणे आहे की, "कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत. ग्रामीण भागातही कॅन्सरचे रुग्ण आढळून येत आहेत ही फार गंभीर बाब आहे. इंदापूर सारख्या ग्रामीण भागात रुग्णांची सेवा घडावी या उद्देशाने मी कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणून काम करून गरीब रुग्णांना मदत करू इच्छितो.
डॉक्टर अनिकेत यांच्या यशानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अभिनंदन करण्यासाठी अनिकेत यांच्या घरी गर्दी करत आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घरी येऊन अनिकेत यांचा कुटुंबीयांसमवेत सत्कार केला. तर माजी मंत्री राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनीही भ्रमणध्वनीद्वारे अनिकेत याचे अभिनंदन केले आहे.
डॉ. अनिकेतच्या यशाने ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळाली आहे,मेहनत आणि जिद्दीने प्रयत्न केल्यास कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. डॉ. अनिकेतच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंब आणि गावाचे लोक खूप आनंदी आहेत. त्यांना विश्वास आहे की, डॉ.अनिकेत आपल्या क्षेत्रात एक यशस्वी डॉक्टर बनेल आणि आपल्या लोकांना, गरीब रुग्णांना मदत करेल. असा आशावाद अनिकेतचे मामा भूषण काळे यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?