उजनी 106 टक्के भरलं,उजनीतून भीमेत सुरु असलेल्या विसर्गात मोठी कपात

Aug 7, 2024 - 07:22
 0  437
उजनी 106 टक्के भरलं,उजनीतून भीमेत सुरु असलेल्या विसर्गात मोठी कपात

आय मिरर

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलाय.उजनी धरणातून सध्या 50 हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीत केला जातोय,उजनीच्या सोळा दरवाजातून हा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भीमा नदी काठाच्या गावांना असणारी धोक्याची पातळी काही अंशी कमी झाली आहे.

उजनी धरण सध्या 106.49 टक्के क्षमतेने भरले आहे.उजनी धरणाची साठवण क्षमता 123 टीएमसी इतकी आहे. उजनी धरणात सध्या एकूण पाणीसाठ्यापैकी 120.71 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. रविवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. सुरुवातीला हा विसर्ग 20 क्युसेक इतका होता. पुढे तो एक लाख 26 हजार इथपर्यंत वाढवण्यात आला. याचवेळी उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून दोन लाख हून अधिक क्युसेकने आवक होत होती. मात्र भीमा खोऱ्यातील पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने दौंड बंधाऱ्यातून उजनीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे.सध्या उजनीत दौंड बंधाऱ्यातून 25537 क्युसेक इतकी आवक येत आहे.

मागील वर्षी उजनी भरलीच नव्हती यावर्षी होती चिंता……

पुणे सोलापूर धाराशिव आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी जीवनदायीनी ठरलेलं उजनी धरण मागील वर्षी पूर्ण क्षमतेने भरू शकले नव्हते. मागील वर्षी 15 ऑक्टोबर 2023 रोजी उजनी धरण हे केवळ 60 टक्केच भरले. म्हणजे उजनीत मागील वर्षी केवळ 95.15 टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. सहाजिकच कमी पर्जन्यमान आणि उजनीच्या पाण्याचा ढासळलेलं नियोजन यामुळे यावर्षीच्या तीव्र उन्हाळ्यात उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांचीच वाताहत झाली. उजनीनं 44 वर्षाचा इतिहास मोडीत काढीन 60 टक्के मायनस इतकी निचांक पातळी गाठली होती. 21 जानेवारी 2023 रोजी उजनी धरण मायनस मध्ये गेलो होते. त्यामुळे यंदा उजनी पूर्ण क्षमतेने भरणार की नाही याचे वेद सर्वांना लागले होते. यंदा भिमा खोऱ्यात पावसाची संततधार लागल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.पाच ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता उजनी धरण 100 टक्के भरले त्यावेळी उजनी धरणात 117 300 पेक्षा अधिक पाणीसाठा होता.

साखर कारखाने,शेकडो उपसा सिंचन योजना आणि लाखो हेक्टर शेती उजनीवर अवलंबून……

उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने, नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत या सोबतच सोलापूर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि एकूणच शेकडो लहान मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना आणि सोलापूर व पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी उजनी धरण हे एक धरण आहे. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या गेलेल्या उन्हाळ्यात उजनी धरण वजा 60 टक्के गेल्याने उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वच लहान मोठ्या उपसा सिंचन योजना बंद पडल्या होत्या. त्यामुळे उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांचीच वाताहात झाली होती .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow