इंदापुरात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीचा बुरुज ढासळला

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक गढी असून सततच्या पावसामुळे या गढीच्या पूर्वेकडील प्रवेशव्दारावरचा बुरुज छासळाला गेलाय. इंदापूर नगर परिषदेने तातडीने पडझड झालेले बुरुज दुरुस्त करावेत अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
या गढीच्या संवर्धनासाठी अनेक वेळा इंदापुरात आंदोलने झाली आहेत.शासन स्तरावर विकास कृती आराखडा तयार करून लवकरच या गढीच्या पुनर्वसन आणि पुनर्जीवीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा झालेला आहे. आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात वारंवार मुद्दे उपस्थित केले आहेत. तर झालेल्या अधिवेशनात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील लक्षवेधी मध्ये हा प्रश्न तारांकित करत सभागृहाचे लक्ष याकडे वेधले होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांसह जिल्हाधिका-यांसमवेत बैठक घेतली होती तर राज्याचे सांस्कृतिक पर्यटन विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात आपल्या दालनात बैठक देखील घेतली होती. लवकरच या संदर्भात कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.
ब्रिटिश राजवटीत याच गढीवरून कारभार चालत होता. त्यानंतर देश स्वातंत्र झाल्यावर याच गढीवर इंदापूरचे तहसील कार्यालय चालू झाले आणि तेथून तालुक्याचा कारभार हाकला जाऊ लागला. मागील अनेक वर्ष या ठिकाणी हा कारभार चालत होता,त्यानंतर इंदापूर शहरात नव्याने बांधलेल्या तहसील कार्यालयात इंदापूर प्रशासनाचा कारभार सुरू झाला.तर याच ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात इंदापूरचे दिवाणी व फौजदारी न्यायालयही चालत होते. याच गढीवर हजरत चांदशहावली बाबा यांचा दर्गाह असून तो हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतिक मानला जातो. प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी बाबांचा उरूस भरत असतो आता पुढील एक-दीड महिन्यात हा उरूस पुन्हा या ठिकाणी भरणार आहे.
गढीची अत्यंत दुरावस्था झाली असून इंदापूर नगर परिषदेने तातडीने पडझड झालेले बुरुज दुरुस्त करून घ्यावेत. गढीच्या पुनर्जीवीकरणासाठी अनेक प्रयत्न झाले आता कृतीची गरज असल्याची मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.
What's Your Reaction?






