"संविधानातून मिळालेली लोकशाही-भारतीय जीवनशैलीचा आधार"

Nov 26, 2023 - 08:27
Nov 26, 2023 - 08:27
 0  285
"संविधानातून मिळालेली लोकशाही-भारतीय जीवनशैलीचा आधार"

लेखिका - स्वाती लोंढे-चव्हाण (लेखिका भारतीय संविधानाच्या अभ्यासक आहेत)

आजच्या संविधान दिनानिमित्त समस्त भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा ! शुभेच्छा देण्याचं कारणही सांगते,"मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय" हेच प्रत्येक भारतीय नागरिकाचं ब्रीदवाक्य असावं अशी अपेक्षा घटनाकारांना होती,त्याअनुंषगाने भारतीय संविधान हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा लिखित स्वरूपातील कायदेशीर दस्तऐवज आहे. ज्याची निर्मिती होऊन ते भारतीयांना स्वतःप्रत अर्पण करेपर्यंतचा इतिहास रोमांचकारी आहे.जगातल्या सर्वात मोठ्या लिखित घटनेवर चालणारा आपला देश कितीही विखुरलेला आणि संघराज्यात विभागलेला असला तरीही कायद्‌याच्या एका समान धाग्यांत या सर्वांना गुंफण्याचं काम घटनाकारांनी मात्र लीलया पार पाडलेले आहे.    

२६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने संमत केलेले संविधान २६जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशांत भारतीयांनी ते स्वतःप्रत अर्पण करून अंमलात आणले आणि आपला भारत प्रजासत्ताक बनला. भारतीय समाजाचा आणि भारत देशाचा इतिहास पाहिला असता देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली, धर्मा-धर्मांत वर्चस्ववादासाठी, सत्तेसाठी लढाया झाल्या, या लढायांमधून वर्चस्व गाजवणारे समुह इथले शासक बनले आणि त्यांच्यानंतर घराणेशाही पद्धतीने त्या शासकांचे वारसदारही ठरले. हजारो वर्षांपासून भारतावर राज्य करणारा राजा हा एखाद‌या राणीच्याच पोटी जन्म घ्यायचा, पण भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या लोकशाही तत्वामुळे भारताचा राजा हा भारतीय मतदार मतपेटीतुन जन्माला घालतो. संविधानात स्वीकारलेल्या तत्वांमुळे भारत देश सावभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक ठरते.

"लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही." ही लोकशाही सामान्यांतल्या सामान्य माणसांमध्ये आपणही या देशाचा लोकनियुक्त राजा होऊ शकतो ही भावना निर्माण करते. भारतीय राज्यघटनेत संसदीय लोकशाहीचा स्वीकार ब्रिटिश राज्यघटनेतील तत्वांचा अभ्यास करून स्वीकारलेला दिसून येतो.भारतीय संविधानातून न्याय,समानता,स्वातंत्र्य,बंधुत्वाला चालना देण्याचं महान कार्य घटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलं.या लोकशाहीतून भारतीयांना आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य मताधिकारातून प्राप्त झालं. राजेशाही आणि हुकुमशाही धुडकावून देशाने लोकशाहीचे तत्व स्वीकारून लोकांच्या हाती सत्ता सोपवली.भारतातील लोक हेच भारताचे सार्वभौम असून भारतावर कोणाचीही मालकी नाही हे भारतीय संविधानानं सिद्ध केलं.भारतात स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीपासूनच भारतीयांना मताधिकार मिळाला, असे करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.भारतीय लोकशाहीमध्ये सर्वांना समान हक्क आणि समान संधीची उपलब्धता घट्‌काकारांनी करून दिलेली आहे.          

भारतामध्ये या देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती आणि कार्यकारी प्रमुख पंतप्रधान ही दोन्हीही पदे भारतीय लोकशाहीतून पार पडणाऱ्या निवडणूक प्रक्रियेतुन निवडली जातात, याचाच अर्थ सत्ता पुर्णपणे भारतीय नागरिकांच्या ताब्यात आहे. भारतीय नागरिकच या देशाचे मालक आणि सार्वभौम आहेत. भारतीय संविधानातून मिळालेली लोकशाही ही केवळ निवड‌णूक प्रक्रियेपुरती मर्यादित न राहता ती भारतीयांची जीवनपद्धती बनली पाहिजे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. ही लोकशाही भारतीय जीवन‌शैलीचा आधार आहे. कारण कायद्‌यापुढे सर्वांना समान न्याय, हक्क, अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे हजारो वर्षांपासुन भारतीय समाजात आस्तित्वात असलेल्या जात‌व्यवस्थेने अनेक भारतीयांना न्याय हक्कांपासुन वंचित ठेवलेले होते, परंतु भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधुता या तत्वांना संविधानाचा मुलभुत पायाच बनवला असल्याने भारतीय संविधान हे मानवी हक्कांचा जाहीरनामाच ठरते.

परंतु स्वातंत्र्यानंतर आणि भारत प्रजासत्ताक झाल्याच्या अनेक वर्षांनंतरही भारतीय स्वातंत्र्यांच्या प्रतिकांबद्दल भारतीयांमध्ये अनास्था आढळून येते. भारतीयांचं स्वातंत्र्य आजही जगाच्या राजकारणात अबाधित ठेवण्याचं काम भारतीय संविधान करत आहे. या देशातल्या सामान्यांतल्या सामान्य माणसाला भारतीय संविधानानं काय दिलं? हे समजणं गरजेचं आहे. संविधानाप्रती जनजागृती होणं आवश्यक आहे भारतीय समाजातील आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर एकच बाब आढळून येते ते म्हणजे भारतीय राजकारण एकतर पैशावर किंवा जातींवर आधारलेलं पाहायला मिळते. परंतु ज्याविशी भारतामध्ये पैसा,पक्ष,जात आणि धर्म न बघता केवळ योग्यतेवर मतदान करून लोकप्रतिनिधी निवडला जाईल त्यादिवशी भारत द्वेष आणि भ्रष्टाचारविरहित सुजलाम् सुफलाम् महासत्ता आणि विश्वगुरू होईल यांत तीळमात्र शंका नाही.ज्या भारतीयाला स्वतःच्या मताचे मोल कळेल त्याच्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नसेल, असे घटनाकारांचे मत होते. आणि असे झाले तरच संविधानातुन मिळालेली लोकशाही ही भारतीय जीवनशैलीचा आधार होईल, याबाबत दुमत नाही.

    

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow