बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा बंद करू नका ! बेलवाडी ग्रामस्थांसह खातेदारांचा इंदापूर बारामती मार्गावर रास्ता रोको - शेकडो महिलांचा ही सहभाग

Sep 27, 2023 - 15:53
Sep 27, 2023 - 15:54
 0  1193
बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा बंद करू नका ! बेलवाडी ग्रामस्थांसह खातेदारांचा इंदापूर बारामती मार्गावर रास्ता रोको - शेकडो महिलांचा ही सहभाग

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा बंद करुन ती लासुर्णे शाखेत विलीन करण्याचा निर्णय संबंधित बँक अधिकाऱ्यांनी घेतला आहे, या निर्णयाच्या विरोधात इंदापूर बारामती राज्य मार्गावर बेलवाडी बस स्थानक येथे आज बुधवारी दि.२७ रोजी विविध गावातील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.यामध्ये मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाला बेलवाडी, कर्दनवाडी, बंबाडवाडी, चव्हाणवाडी, शेळगाव, थोरातवाडी, बोरी, कुरवली, उद्धट, पवारवाडी, जांब, चिखली, तावशी, मानकरवाडी, जाचकवस्ती ग्रामस्थांसह बँक खातेदार शालेय विध्यार्थी महिला बचत गटांचा कडाडून विरोध आहे.

निवेदनात म्हटले आहे की,आम्ही समस्त ग्रामस्थ बेलवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बेलवाडी यांचे खातेदार ठेवीदार, कर्जदार आहेत. सदर बँक ग्राहकाच्या सेवेसाठी अंदाजे 15 वर्षा पूर्वी स्थापन झाली.सदर बँक स्थापनेचा उद्देश हा होता कि आम्हा ग्राहकांची बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासुर्णे येथे गैरसोय होत होती व आर्थिक देवाण घेवाण करण्यास वेळ जास्त होता.तसेच शालेय विद्यार्थी, महिला बचत गट, पुरुष बचत गट, शेतकरी, व्यापारी इत्यादींनी बेलवाडी शाखेत व्यवहार करणे सोईचे होते.

परंतू सदर बँकेचे अधिकारी यांनी शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला असून सदरील शाखा लासुर्णे या शाखेत विलीन करण्यात येणार आहे, त्यामुळे आमची कायमस्वरूपी गैरसोय होणार आहे.वास्तविक प्रधानमंत्री यांनी दिलेल्या घोषणेप्रमाणे आम्ही ग्राहकांनी सदर बँकेमध्ये जन धन योजनेतून खाती उघडली असून बँकेचे मोठ्या प्रमाणावर खातेदार वाढले आहेत. सदर बँकेचा नफा जादा आहे. म्हणजे बँक तोट्यात चालण्याचे कारणच नाही. सदर बँक चालू राहणे गरजेचे आहे. सदर बँक बंद करण्याचा निर्णय झाल्यास बेलवाडी, कर्दनवाडी, बंबाडवाडी, चव्हाणवाडी, शेळगाव, थोरातवाडी, बोरी, कुरवली, उद्धट, पवारवाडी, जांब, चिखली, तावशी, मानकरवाडी, जाचकवस्ती इत्यादी गावातील 15 हजार खातेदारांची गैरसोय होणार आहे. तसेच बचत गटातील ४५०० महिलांनी गैरसोय होणार आहे. 

तसेच सदर बँकेत जवळपास ७ ते ८ कोटी रुपयांचे ठेवी देखील आहेत. सदरील बँकेतील काही कर्ज खाती थकीत असल्याचे कारण देऊन बँक विलीन करणे योग्य होणार नाही. सदरील थकीत कर्जदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाही करण्याची जबादारी बँक अधिकाऱ्याची आहे. त्यासाठी आम्ही ग्रामस्थ देखील सहकार्य करण्यास तयार आहोत.त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बेलवाडी हि बंद करण्यात येऊ नये.अशी मागणी खातेदारांसह ग्रामस्थांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow