बारामतीत उड्डाणपुलाचा 'रिस्ट्रिक्टर' कोसळला, दुचाकीस्वार जखमी

Nov 22, 2023 - 16:44
Nov 22, 2023 - 16:45
 0  623
बारामतीत उड्डाणपुलाचा 'रिस्ट्रिक्टर' कोसळला, दुचाकीस्वार जखमी

आय मिरर

बारामतीतील रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहने ये-जा करू नयेत, या उद्देशाने पालिकेने उभारलेला 'रिस्ट्रिक्टर' (लोखंडी कमान) एका कंटेनरमुळे तुटला. बाजूने जात असलेल्या दुचाकीस्वारावर तो पडला.या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी असतानाही पालिका, वाहतूक पोलिस, आटीओ प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने, त्यातून ही घटना घडली.

बारामती शहरातील उड्डाणपुलावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार अपघात होत असून अनेक जण यात गंभीर जखमी तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मंगळवारी (दि. 21) सकाळी दहा वाजता सातव चौक ते भिगवण रस्त्याला जोडणार्‍या उड्डाणपुलावर जडवाहतूक करणार्‍या कंटेनरने या ठिकाणी असलेली लोखंडी कमान तोडली. यामुळे ही कमान दुचाकीवर पडल्याने एक युवक गंभीर जखमी झाला. गेल्याच आठवड्यात उड्डाणपुलाच्या खाली भिगवण रस्त्यालगत एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात घडला होता. या अपघातात जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वाराचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. यात किती लोक जखमी अथवा किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे होणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

बारामती बाह्य मार्गावरील सातव चौक ते भिगवण रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहनांची वाहतूक होऊ नये म्हणून याठीकाणी लोखंडी कमान बसवण्यात आली आहे. तीच या कंटेनरने पाडली. यामुळे लोखंडी रॉड तुटून दुचाकीचालकाला लागला. यामध्ये तो गंभीरित्या जखमी झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow