इंदापूरच्या जागेचा उद्या'सागर' वर होणार फैसला ? फडणवीसांसोबत इंदापूर भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक ! फडणवीसांच्या भुमिकेकडे लक्ष 

Mar 28, 2024 - 19:25
 0  793
इंदापूरच्या जागेचा उद्या'सागर' वर होणार फैसला ? फडणवीसांसोबत इंदापूर भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक ! फडणवीसांच्या भुमिकेकडे लक्ष 

आय मिरर (देवा राखुंडे) 

देशात सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे.यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाची नजर आहे. अजित पवारांसाठी ही अस्तित्वाची लढाई असून ऐनवेळी अजित पवारांना इंदापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोंडीत पकडले आहे.त्याला कारण ठरलंय ते म्हणजे इंदापूर विधानसभेची जागा. 

अजित पवारांकडून सातत्याने आपली फसवणूक झाली. लोकसभेला गोड बोलून काम करून घेतले मात्र विधानसभेला आमच्या पाठीत खंजीर खूप असल्याची टीका हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. तोच सूर इंदापूर तालुक्यातील भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी पुढे ओढत सध्याच्या लोकसभेला अजित पवारांना मदत करण्यास इंदापूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सध्यातरी असमर्थता दर्शवली आहे. 

राज्यात महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादीच्या गोठात गेली असून या जागेवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरतील हे जवळपास निश्चित आहे. मात्र अशा स्थितीत इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे.

2009,2014 आणि 2019 ला हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांचं काम केलं. हर्षवर्धन पाटील यांच्या सहकार्यामुळे सुप्रिया सुळे दिल्लीच्या तक्तावरती पोहोचल्या मात्र या तिन्ही वेळेला विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस कडून हर्षवर्धन पाटील यांना दगाचं फसवलं गेलं झाला अशा थेट आरोप हर्षवर्धन पाटील समर्थकांनी केला आहे.2019 मध्ये लोकसभेनंतर विधानसभेला अजित पवारांनी शब्द फिरवल्याचा आरोप पाटील यांनी करत काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केला. मात्र आता तेच अजित पवार भाजप सोबत महायुतीत आल्यानं इंदापूर विधानसभेची जागा महायुतीत कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जोपर्यंत इंदापूर विधानसभेच्या जागेवरती चर्चा होत नाही,ही जागा भाजपला सोडली जात नाही, हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी पक्की होत नाही तोपर्यंत भाजपचे कार्यकर्ते लोकसभेला अजित पावरांना सहकार्य करणार नाहीत अशा भूमिकेत आहेत. आणि हाच तिढा सोडवण्यासाठी शुक्रवारी 29 मार्च रोजी मुंबईतील सागर बंगल्यावरती हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत या प्रश्नावर फडणवीस नेमका काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow