आत्ताची मोठी बातमी ! अविनाश धनवेचे मारेकरी 48 तासाच्या आत सापडले ; स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिसांकडूक चौघांना अटक

Mar 18, 2024 - 16:09
Mar 18, 2024 - 16:10
 0  5023
आत्ताची मोठी बातमी ! अविनाश धनवेचे मारेकरी 48 तासाच्या आत सापडले ; स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिसांकडूक चौघांना अटक

आय मिरर

पुणे जिल्ह्यातील इंदापूर बायपासवरील जगदंब हाॅटेलवर मागील तीन दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. शनिवारी 16 मार्च रोजी हॉटेलवर जेवायला थांबलेल्या अविनाश धनवेवर गोळीबार केला गेला. कोयत्याने वार करीत त्याला संपवलं गेलं. संपूर्ण राज्याचे लक्ष या घटनेने वेधलं. मात्र घटना घडल्यापासून 48 तासाच्या आत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांच्या पथकाने या हत्याकांडातील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.तर उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

शिवाजी बाबुराव भेंडेकर, (वय ३५ वर्षे, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे),मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २० वर्षे, रा. आंबेडकर चौक, पोलीस चौकी समोर, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे), सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय २० वर्षे, रा. शाळा नं. ४, चन्होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे) आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते, (वय २२ वर्षे, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नांवे आहेत.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बायपास वर असणाऱ्या हॉटेल जगदंब मध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास अविनाश बाळु धनवे (वय ३१ वर्षे, रा. चन्होली, वडमुखवाडी, ता. हवेली जि. पुणे) याच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात अविनाश धनवे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियात अवघ्या राज्यभर पसरला गेला.

अविनाश धनवे हा त्याचे इतर तीन मित्र बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजु एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांच्या सोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देवून हे चौघेही जेवण येण्याची वाट पाहत होते.दरम्यान आठ जणांचे टोळक्याने हातात पिस्टल, कोयता घेवून हॉटेल मध्येच अविनाश धनवे याच्यावर पिस्टल मधून फायरींग केले. त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याची जागीच हत्या केली. यावेळी अविनाश सोबत असणारे इतर तीन मित्र हे त्या ठिकाणाहून पळून गेले.याबाबत अविनाश धनवे याची पत्नीने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.त्यावरुन इंदापूर पोलीसात खूनाचा अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा घडल्यानंतर संबंधित आरोपी हे कोल्हापूरकडे पळाले असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शिवाजी बाबुराव भेंडेकर,मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे,सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते यांना पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर यापुर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील इतर आरोर्पीचा शोध सुरू आहे.

झालेला गुन्हा पूर्व वैमन्यस्यातून…

घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तपासून व फिर्यादी यांच्याकडून प्राप्त माहितीचे आधारे सदरचा गुन्हा दोन टोळीतील पूर्व वैमन्यस्यातून झालेला असल्याचे निष्पन्न झाले.मयत अविनाश बाळू धनवे याची चर्होली, आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता, त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याच्या विरोधी टोळीनेच केला असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याचं पोलीसांनी सांगितले.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एस.डी.पी.ओ.भाऊसाहेब ढोले, (हवेली विभाग), स्वप्निल जाधव (दौंड विभाग), सुदर्शन राठोड (बारामती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलीस स्टेशनचे पो.नि. सुर्यकांत कोकणे स्था.गु.शा.चे सपोनि योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, पो.उप निरीक्षक प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, अमित सिद पाटील, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश धिगळे, अजय घुले, प्रकाश वाघमारे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे, विक्रम तापकीर, दिपक साबळे, संदीप वारे, बाळासाहेब खडके, राहुल घुबे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, निलेश शिंदे, काशिनाथ राजापुरे, अक्षय सुपे, दगडू विरकर इंदापूर पो.स्टे. सपोनि प्रकाश पवार, पोसई गरड, पोलीस अंमलदार प्रकाश माने, सचिन बोराडे, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, अमित यादव, विनोद काळे, मपोहवा माधुरी लडकत यांनी केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करणेत येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow