बिग ब्रेकिंग || कुंभारगावच्या सरपंच उज्वला परदेशी विभागीय आयुक्तांकडून अपात्र, सौरभ राव यांनी दिला निर्णय

Jan 3, 2024 - 09:36
 0  4101
बिग ब्रेकिंग || कुंभारगावच्या सरपंच उज्वला परदेशी विभागीय आयुक्तांकडून अपात्र, सौरभ राव यांनी दिला निर्णय

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच श्रीमती उज्वला दत्तात्रय परदेशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९ प्रमाणे सार्वत्रिक निवडणुक २०२१ चे उर्वरित कालावधीसाठी सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरवण्यात आले आहे. पुणे विभागिय आयुक्त सौरभ राव यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 01 जानेवारी रोजी हा निर्णय दिला आहे.

ज्ञानराज कुंडलिक धुमाळ आणि गोकुळ किसन येडे, रा. कुंभारगाव ता. इंदापुर जि. पुणे यांनी शाळेच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा बाबात आयुक्ताकडे तक्रार केली होती.केलेल्या तक्रारीवरून चौकशी समितीच्या अहवाल प्राप्ती वरुन विद्यमान सरपंच उज्वला परदेशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९ प्रमाणे पुढील कालावधी करीता सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरवण्यात आले आहे.तक्रार दारांच्या वतीने आयुक्तांपुढे अँड. इम्रान चांद खान यांनी बाजू मांडली आहे.

काय आहे प्रकरण…

कुंभारगांव ग्रामपंचायतीचा २०२१ ते २०२६ असा कार्यकाळ आहे.उज्वला परदेशी या विद्यमान सरपंच होत्या.ज्ञानराज कुंडलिक धुमाळ यांनी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी तर गोकुळ किसन येडे यांनी दि.०५ डिसेंबर २०२२ रोजी विभागिय आयुक्त कार्यालयास तक्रारी अर्ज दाखल करीत गैरकारभाराची चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती.त्यानुसार विभागीय आयुक्तांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीचे आदेश देत गैरव्यवहार आढळल्यास कार्यवाहीसाठी निर्देश मागणीचा प्रस्ताव मागवला होता.

दोन्ही तक्रारदारांच्या अर्जानुसार एक समिती गठीत करीत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली.प्राप्त चौकशी अहवालात काही बाबींमध्ये प्रथमदर्शनी अनियमितता आढळून आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागिय आयुक्तांकडे कार्यवाहीसाठी निर्देश मागवले होते.या संपूर्ण प्रकरणात उज्वला परदेशी यांना १७ आँक्टोंबर २०२३ आणि ०५ डिसेंबर २०२३ रोजी आपली बाजू मांडण्यासाठी मुभा देण्यात आली होती.

जि. प. प्राथमिक शाळा कुंभारगाव (धुमाळवाडी) दुरुस्ती करणे करीता 2019-2020 या आर्थिक वर्षात मंजर झाले. सदरचे काम विद्यमान सरपंच परदेशी या पदावर येणेपूर्वीच पूर्ण झाले आहे.मात्र सदर कामाचा निधी विद्यमान सरपंच उज्वला परदेशी यांच्या कालावधीत जि.प.कडुन ग्रामपंचायतीस प्राप्त झाला असुन त्यानुसार झालेल्या कामाचे पैसे विद्यमान सरपंच परदेशी यांचे कालावधीत अदा करणेत आले. सदरचे कामात अनियमितता झाली असलेचे सचिव तथा ग्रामसेवक यांनी निदर्शनास आणून देऊनही व ग्रामपंचायत कार्यकारिणीचा विरोध असुनही सरपंच उज्वला परदेशी यांनी स्वतः जबाबदारी व पुढाकार घेऊन सदर कामाचे पैसे अदा केलेचे दिसून आल्याचं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आदेशात म्हटले आहे.

मौजे कुंभारगाव येथील गट नं.२९५ गटातील अतिक्रमणाबाबत दि.०७ जून २०२१ रोजीचे मासिक सभेतील विषय क्र.७ ठराव क्र.७ मध्ये दत्तात्रय नगरे, संजय ढोले, शहाजी धुमाळ, भागुनी धुमाळ व इतर यांचे अतिक्रमणाचे अनुषंगाने सरपंच उज्वला परदेशी यांनी "यापुढे मी अतिक्रमणाच्या प्रकरणात सहभाग घेणार नाही, तसेच कोणत्याही नोटीसवर सही करणार नाही' अशी भूमिका घेतली. वास्तविक ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मिळकतीवर तसेच शासकीय जागा, जमीनी यावर अतिक्रमण होणार नाही, होत असल्यास ते तात्काळ रोखणे ही ग्रामपंचायतीची कायदेशीर जबाबदारी आहे. याबाबत न्यायालयात दाखल दाव्यामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका नियमानुसार योग्यरित्या सादर करणे, न्यायालयाचे आदेश/ निर्देश विचारात घेऊन अतिक्रमणे रोखणे नियमानुसार आवश्यक असताना, याऊलट यापुढे अतिक्रमणाच्या प्रकरणात सहभाग घेणार नाही ही सरपंच परदेशी यांची भूमिका उचित वाटत नाही. सदरची भूमिका ही कर्तव्याप्रती हेळसांड असलेचे दिसून येत असल्याचे ही विभागीय आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

सदरचा निकाल मान्य नाही, मंत्रालयात अपील करणार - उज्वला परदेशी 

सदरचा निकाल मला मान्य नाही.अतिक्रमना बाबत ज्या चार लोकांना नोटीस काढायला सांगितल्या होते त्यावेळी कुंभारगांव हे पुनर्वसित गावठान असून अर्धे गांव गायरानात वसलेले आहे. ज्या गट नंबरचा विषय होता त्याची मोजनी झालेली नसल्याने नेमकी कोणाची अतिक्रमणे आहेत किंवा नाहीत हे स्पष्ट नसल्याने कारवाई केली तर सर्वांवर करावी किंवा कोणावरचं नको अशी माझी भुमिका होती.जोपर्यंत मोजनी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नोटीसवर सही करण्यास मी नकार दिला यात गैर काय? शाळेचे काम मी सरपंच पदावर येण्यापूर्वी झाले आहे.सदरच्या कामाचे साहित्य तत्कालिन सरपंच आणि ग्रामसेवक व सदस्यांच्या काळात खरेदी केले आहे आणि काम ही त्याच काळात पूर्ण झाले. परंतु त्या केलेल्या कामाचे क्रेडीट बील ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध आहे.पुणे जिल्हा परिषदेकडून मार्च २०२१ मध्ये ग्रामपंचायतला या झालेल्या कामाचे पैसे वर्ग झाल्याने ठरावा प्रमाणे आणि केलेल्या कामाचे क्रेडीट बीलाप्रमाणे मी सरपंच या नात्याने केवळ हे क्रेडिट बिलाचे पैसे संबंधितांना वर्ग करण्यास आदेश दिले आहेत.संपूर्ण कामात माझा कोणाताही संबंध नाही किंवा ते काम माझ्या काळातही झालेले नाही. त्यामुळे झालेला निकाल मला मान्य नसून याविरोधात मंत्रालयात अपील करुन दाद मागणार आहे. - उज्वला परदेशी

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow