कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे - हर्षवर्धन पाटील
आय मिरर
मे.वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांचा 17-18 महिन्यांपासून संपलेला वेतनवाढीचा करार येत्या दोन महिन्यात करणे तसेच सर्व थकीत पगार अदा करणे आदी निर्णय मुंबईत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या समवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आले, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा गेली 42 चालू असलेला संप मिटला असून, कर्मचारी गुरुवार दि. 4 पासून कामावर रुजू होतील, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.2) दिली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली आहे. मे.वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगार दि. 22 नोव्हेंबर पासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर होते. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांमगारांच्या विविध प्रश्नांबाबत मुंबईत मंत्रालयात सर्व संबंधितांच्या बैठकीचे आज मंगळवारी (दि.2) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजचे मालक चिराग दोषी, वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी आदींनी चर्चेमध्ये भाग घेतला. या बैठकीमध्ये सर्वमान्य तोडगा करण्यात आला आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
वेतन वाढीचा करार कामगार मंत्र्यांच्या सहीने होणार असून करार संपला त्यावेळी पासून चा फरक लागू होईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराची 40 टक्के रक्कम येत्या सात दिवसात व त्यानंतर दोन महिन्यात 30 : 30 टक्के या प्रमाणे थकीत पगाराची सर्व रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यावर आकसाने शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसून, उत्पादन वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे बैठकीत ठरल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
हर्षवर्धन पाटील यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचेशी दि.10 डिसें. रोजी दूरध्वनीवरुन चर्चा करून वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या संपासंदर्भात सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी विनंती केली होती. हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या विनंतीनुसार कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांच्या प्रश्नावर मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण हर्षवर्धन पाटील यांना शासनाच्या वतीने देण्यात आले होते. या बैठकीतून कामगारांच्या मागण्यांवरती सर्वमान्य तोडगा निघाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
कामगार मंत्री वालचंदनगरला येणार - हर्षवर्धन पाटील
या बैठकीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांना वालचंदनगरला भेट देण्याचे निमंत्रण हर्षवर्धन पाटील यांनी दिले. सदरचे निमंत्रणाचा स्वीकार करीत लवकरच वालचंदनगरला भेट देण्यासाठी येणार असल्याचे यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.
What's Your Reaction?