शेट्टी आणि खोत इंदापुरात एकत्र आले,एकाच सोफ्यावर बसले पण...

आय मिरर
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून हातात हात घालत राज्य सरकारला जेरीस आणणारी जोडी म्हणून एकेकाळी शेट्टी आणि खोतांच्या जोडीला ओळखलं जायचं. मात्र कालांतराने ही जोडी फुटली दोघांनी आपापल्या वाटा वेगळ्या निवडल्या,संघटना ही वेगळे झाल्या.
खोत एनडीए सोबत गेले तर राजू शेट्टी हे स्वतंत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपला लढा देत राहिले. मात्र शेतकरी संघटनेतील मतभेदांमुळे अगोदरच तणावग्रस्त असलेले हे दोन्ही नेते, आजच्या एका प्रसंगामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात यानंतरच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
आज हे दोन्ही नेते 2011 सालच्या एका खटल्याच्या निमित्ताने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात एकत्र आले होते. माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर दाखल असलेल्या एका खटल्या प्रकरण या दोघांनाही आज न्यायालयात उपस्थित राहावे लागलं.
हे दोन्ही नेते न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने इंदापुरात एकत्र आले, वकिलांसाठी असलेल्या एका खोलीमध्ये एकाच सोप्यावरती बसले मात्र एकमेकांच्या नजरेला नजर देखील लावली नाही. त्यामुळे खोत आणि राजू शेट्टी यांच्यातील असणारा संघर्ष आजही तितकाच ज्वलंत असल्याचे पाहायला मिळालं.
याच मुद्द्यावरून प्रसारमाध्यमांनी राजू शेट्टी यांना सवाल न्यायालयीन कामकाजा निमित्त आज दोघे एकत्र आलात यापुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकत्र याल का असा खोचक सवाल विचारला असता सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात नाही असं म्हणत राजू शेट्टी यांनी खोतांना टोला लगावला.
2012 साली कर्मयोगी आणि इतर साखर कारखान्याच्या वर उसाच्या दरासंदर्भात आंदोलन झालं होतं. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर सात आठ गुन्हे आमच्यावर दाखल होते.त्याच्या तारखेसाठी आज आलो होतो. अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.तर शेट्टी आणि खोत एकत्र येण्यावर आजचा हा निव्वळ योगायोग असल्याचं खोत यांनी म्हटलं.
कोकाटे यांना तातडीने नारळ द्या...
दरम्यान राजू शेट्टी यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून ही भाष्य केलं आहे.या माणसाला अजून मंत्रिमंडळात का ठेवलेय हा माझा अजित पवारांना सवाल आहे.समज देऊन देखील त्याच्यावर काही परिणाम होत नाही. त्याने शेतकऱ्यांची वारंवार चेष्टा केली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान केला आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्राचे विधिमंडळ आहे. त्या ठिकाणी हे लोक जर जंगली रमी खेळत असतील तर त्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकारच काय ?माणिकराव कोकाटे यांना तातडीने नारळ दिला पाहिजे.
माणिकराव कोकाटे यांनी शनि देवाचे दर्शन घेतलं त्यांना शनी पावला की नाही माहित नाही पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा त्यांच्यावर राग आहे. अजित पवार नाराजी व्यक्त करत आहेत पण ठामपणे राजीनामा द्या असं सांगत नाहीत.एकनाथराव शिंदे,अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची काय गुपित कोकाटे यांकडे आहेत माहीत नाही त्यामुळे कदाचित ते कारवाई करायला घाबरत असावेत अशी टीकाही शेट्टी यांनी केली.
हे राज्य कसं चाललंय हे सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे गेला आहे.शेतकरी आत्महत्या करतोय 90000 कोटीची ठेकेदारांची बिले थकले आहेत त्यामुळे ठेकेदार आत्महत्या करतोय. कंत्राटी पद्धतीने वेगवेगळे विभागात काम करणारे सरकारचे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारी नाहीत. रोजगार हमीतून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी काढले आहेत त्यांना मजुरी मिळत नाही.गाजावाजा करून मुख्यमंत्री पानंद योजना राबवली त्या योजनेला पैसा नाही.यांचे भत्ते मिळत आहेत यांना उडवायला पैसा मिळत आहे पण सरकारमध्ये ज्या जबाबदार आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाहीत असंही शेट्टी यांनी म्हटलं.
तिन्ही पक्षांवर महाराष्ट्रातील जनता नाराज...
महायुतीमध्ये धुसफूस आहे की नाही माहित नाही परंतु तिन्ही आघाड्यांवर तिन्ही पक्षांवर महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. सरकार शक्तीपीठ मार्ग करण्यावर ठाम आहे पण आम्ही शक्तिपीठ मार्ग होऊच देणार नाही.पहिल्यापासून रेखांकन करण्यापासून आम्ही त्याला विरोध केला आहे. निवडणुका लढवणं हा आमचा मार्ग नाही लोकांना न्याय मिळवून देणं हा आमचा मार्ग आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.मात्र आता यात सर्वोच्च न्यायालयाने ही राज्य सरकारला धक्का दिलाय त्यामुळे वरिष्ठांचे ऐकून निरापराध लोकांना मारहाण केल्यावर काय होतं हे आता पोलिसांना कळेल असेही शेवटी म्हणाले.
What's Your Reaction?






