DOUND FIRE राष्ट्रवादीचे आ.शंकर मांडेकर यांच्या बंधूला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी !

आय मिरर
दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणातील भोर मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप आणि रघुनाथ शंकर आव्हाड या तिघांना दौंड न्यायालयाने 28 जुलै पर्यंत म्हणजे सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरील तीनही आरोपींना गुरुवारी 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता दौंड न्यायालयात श्री जी.एस.बडगुजर (दिवाणी न्यायाधीश प्रथमवर्ग) यांपुढे हजर करण्यात आलं. 4 वाजून 35 मिनिटांनी न्यायालयात सुनावणी सुरू झाली. पोलीस, आरोपी आणि वकील वगळता इतर कोणालाही न्यायालयात प्रवेश दिला गेलेला नव्हता. यावेळी आरोपींच्या वतीने एडवोकेट प्रशांत गिरिमकर यांनी युक्तिवाद केला.
सदरची घटना घडल्यानंतर आरोपी कुठे गेले होते अन्य एक आरोपी अद्याप याप्रकरणी अटक करणे बाकी आहे याशिवाय पिस्टल कोणाचा आहे गोडी का झाडली नेमकं काय घडलं याचा तपास करणे आवश्यक असल्याचे कारण देत सरकारी वकील यांना आरोपींची पोलीस कोठडी मागितली यावर न्यायालयाने 28 जुलैपर्यंत तीनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या प्रकरणातील फरार असलेला चौथा आरोपी चंद्रकांत मारणे हा देखील गुरुवारी 24 जुलै रोजी स्वतःहून येवत पोलिसात हजर झाला असल्याची माहिती आरोपीचे वकील प्रशांत गिरमकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली असून आव्हाड याला शुक्रवारी पोलीस न्यायालयात हजर करतील असंही गिरमकर यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण...
21 जुलै रोजी रात्री बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, रघुनाथ आव्हाड आणि चंद्रकांत मारणे हे चार जण दौंड तालुक्यातील वाखरी येथील अंबिका कला केंद्र आले. या सर्वांनी रुईकर पार्टी यांची पार्टी निवडून बैठकीचा कार्यक्रम केला. याच दरम्यान रात्री सव्वा अकरा वाजता त्या ठिकाणी गोळीबार झाला. हा नेमका गोळीबार कोणत्या कारणासाठी आणि कसा झाला याचं कारण अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही. याचा तपास करणे बाकी आहे, मात्र असं असलं तरी पार्टी संपताना गाणं कोणतं वाजवायचे यावरून वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
आरोपींनी हवेत गोळीबार केला यावेळी पिस्तुलातून सुटलेली गोळी ही खोलीतील भिंतीच्या वरच्या छताला लागली त्यामुळे यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याचवेळी अंबिका जाधव ही उपस्थित असणारी महिला चक्कर येऊन पडली असेही पोलिसांनी सांगितलं ज्यावेळी फायर झालं त्यावेळी त्या ठिकाणी पाच महिला उपस्थित होत्या त्यांनाही चौकशी कामी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ही घटना घडल्यानंतर हे चारही आरोपी घटनास्थळावरून निघून गेले होते.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?
सोमवारी 21 जुलै रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली मात्र शेकडोंचा लवाजमा त्या ठिकाणी असतानाही गोळीबाराच्या घटनेची कोणतीही चर्चा बाहेर पसरली गेली नाही. तब्बल 24 तासाने मंगळवारी रात्री या घटनेची दबक्या आवाजात चर्चा झाली तोपर्यंत अंबिका कला केंद्राचे संचालक मॅनेजर आणि त्या ठिकाणच्या नृतिका या सर्वांनी ही घटना पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.
मंगळवारी रात्री दबक्या आवाजात याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रसार माध्यमात याचे वृत्त प्रसारित झाले. त्यानंतर पोलीस खातं खडबडून जागं झालं, विशेष बाब म्हणजे सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजता झालेल्या गोळीबाराची काडीची खबर काही अंतरावरच असणाऱ्या केडगाव चौकीला देखील मिळाली नाही आणि यवत पोलिसांना देखील लागली नाही यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात होते.
याप्रकरणी कोणीही तक्रारदार पुढे न आल्याने पोलिसांना याची कल्पना मिळाली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र ज्यावेळी याची माहिती मिळाली त्यावेळी यवत पोलिसांचे पथक दौंड तालुक्यातील शासन मान्यता प्राप्त असलेल्या कला केंद्रात गेले त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थापनाकडे कलावंतांकडे चौकशी केली सीसीटीव्हीची तपासणीही केली मात्र बुधवार दिनांक 23 जुलैपर्यंत गोळीबार झाला आहे किंवा नाही याची कोणतीही पुष्टी झाली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
बुधवार दिनांक 24 जुलै रोजी या घटनेची संपूर्ण राज्यात खळबळ उडाल्यानंतर आणि आमदार रोहित पवार यासोबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणावर खरमरीत प्रतिक्रिया दिल्यानंतर प्रशासन वेगानं धावलं आणि या गोळीबाराचा छडा लावला. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास गोळीबार झाला आहे मात्र कोणी जखमी झालेलं नाही गोळी खोलीतील छताला लागली आहे आणि त्या ठिकाणी काही निशान देखील आढळून आले आहेत तर जमिनीवर पडलेला गोळीचा चपटा झालेला तुकडा देखील अंबिका कला केंद्राच्या व्यवस्थापकाने पोलिसांच्या कडे सुपूर्त केला आणि त्या व्यवस्थापकाच्या तक्रारीनुसार संबंधित चार व्यक्ती विरोधात यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ....
मंगळवारी रात्री ज्यावेळी या घटनेची खबर प्रसार माध्यमांना लागली तेव्हापासूनच पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील बड्या नेत्याचा भाऊ या प्रकरणात असून त्यानेच गोळीबार केला आहे अशा आशयाचा वृत्त प्रसारित झालं, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात नेमकं कोण आहे कोणी हा गोळीबार केला असावा याचा प्रत्येक जण अंदाज लावत होता. अगदीच बुधवारी गुन्हा उघड होईपर्यंत आणि गुन्ह्यातील आरोपीचे नाव फिर्यादी कडून तक्रारीत येईपर्यंत नेमका आरोपी कोण आणि त्याचे राजकीय नेत्यांशी कोणते लागेबांधे आहेत हे स्पष्ट नव्हतं जेव्हा आरोपींची नावे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी प्रसार माध्यमांना सांगितली त्यावेळी यातील बाळासाहेब मांडेकर हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बोर हवेलीचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा धाकटा भाऊ असल्याचं स्पष्ट झालं.
आरोपींना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न...
आमदाराच्या बंधूनी त्या ठिकाणी गोळीबार केला त्यात एका महिलेला इजा पोहोचली आहे, पोलीस जर माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर योग्य ठरणार नाही, उद्या जरी या सगळ्या गोष्टी खाऱ्या निघाल्या तर पोलीस अधिकारी माहिती लपवत आहेत म्हणून कारवाई करावी लागेल खरी माहिती लोकांसमोर आली पाहिजे, सत्तेतील लोकांचा दबाव आहे,त्या महिलेवर पण दबाव आहे. असा आरोप शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला होता.
गृहमंत्री फक्त राजकीय कार्यक्रमाला फक्त पुण्यात पण कधी बलात्कार कोयता याला येत नाही,भाजपने म्हणत फडणवीस यांनी कोयता गँग संपवले म्हणून फडणसांची बॅनर लावले होते पण कुठे कोयता गँग संपली का? फडणवीस राजकीय कामात बिझी असतील तर आता कायदा सुव्यवस्थेचा काय याला जबाबदार कोण, गृहमंत्री म्हणून फडणवीस राज्यातल्या पुण्यातल्या गुन्हेगारीला जबाबदार आहेत.
कोण आहे बाळासाहेब हिरामण मांडेकर ?
- बाळासाहेब हिरामण मांडेकर हा भोर चे आमदार शंकर हिरामण मांडेकर यांचा भाऊ आहे.
- बाळासाहेब हिरामण मांडेकर हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नेता आहे.
- बाळासाहेब मांडेकर हा मुळशी तालुक्यातील चांदेगावचा रहिवाशी आहे.
- बाळासाहेब मांडेकर याचे आमदार शंकर मांडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही फोटो देखील समोर आलेत.
- आमदार शंकर मांडेकर आणि बाळासाहेब मांडेकर हे दोघे सख्खे भाऊ आहेत.
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब मांडेकर हा सातत्यानं चौफुला या ठिकाणी असणाऱ्या लोककला केंद्रांमध्ये जात होता.
What's Your Reaction?






