बारीत नाचताना हवेत गोळीबार करणारा 'राष्ट्रवादी'च्या आमदाराचा भाऊ ! आ.शंकर मांडेकर यांच्या भावावर गुन्हा दाखल

आय मिरर
सोमवारी 21 जुलै च्या रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी अंबिका कला केंद्रात पुणे जिल्ह्यातील एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची घटना घडली. मात्र आता हा आमदार कोण हे स्पष्ट झाल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या सख्ख्या भावानेच हा गोळीबार केल्याची माहिती समोरीत असून या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंडच्या चौफुला वाखारी येथील अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब अंधारे यांच्या फिर्यादीवर बुधवारी सायंकाळी यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा आरोपी बाळासाहेब मांडेकर हा भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ आहे.. बाळासाहेब मांडेकर यांच्यासह यवत पोलीस ठाण्यात गणपत जगताप,चंद्रकांत मारणे यासह आणखी एका अनोळखीवर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कोण आहे बाळासाहेब हिरामण मांडेकर ?
- बाळासाहेब हिरामण मांडेकर हा भोर चे आमदार शंकर हिरामण मांडेकर यांचा भाऊ आहे.
- बाळासाहेब हिरामण मांडेकर हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नेता आहे.
- बाळासाहेब मांडेकर हा मुळशी तालुक्यातील चांदेगावचा रहिवाशी आहे.
- बाळासाहेब मांडेकर याचे आमदार शंकर मांडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही फोटो देखील समोर आलेत.
- आमदार शंकर मांडेकर आणि बाळासाहेब मांडेकर हे दोघे सख्खे भाऊ आहेत.
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब मांडेकर हा सातत्यानं चौफुला या ठिकाणी असणाऱ्या लोककला केंद्रांमध्ये जात होता.
नेमकं काय घडलं ?
दौंड परिसरातील वाखारी येथील अंबिका लोककला केंद्रात मौजमजेसाठी गेलेले भोर-वेल्हा- मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार शंकर मांडेकर यांचा बंधू बाळासाहेब मांडेकर याने २१ जुलै रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास हवेत गोळीबार केला. मात्र या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
अंबिका लोककला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब राजश्री अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी बाळासाहेब मांडेकर यांच्यासह गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
२१ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता बाळासाहेब मांडेकर आणि त्यांचे सहकारी अंबिका कला केंद्र येथे आले होते. रात्री १०:३० वाजता तिसरी पार्टी घेतली. यात ५ महिलाही उपस्थित होत्या. पार्टीदरम्यान रात्री सव्वाअकरा वाजता बाळासाहेब मांडेकर याने नाचताना बंदूक काढून हवेत गोळीबार केला. गोळी भिंतीला व छताला लागल्याचे सांगण्यात येते. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले. घटनास्थळी भिंतीवर व छतावर गोळी लागल्याचे ठसे दिसून आले. फरशीवर गोळीचा चपटा झालेला तुकडा देखील तक्रारदाराला मिळून आला, जो त्यांनी पोलीस ठाण्यात सादर केला.अशी माहिती देखील मिळत आहे.
बाळासाहेब मांडेकर याने नाचताना अचानक बंदूक काढून गोळीबार केल्यानंतर कला केंद्रात एकच खळबळ उडाली. लोकांत अफरातफर माजली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. केंद्राच्या मॅनेजरच्या तक्रारीनुसार चार आरोपींवर बीएनएस कलम १२५ व आर्म अॅक्ट ३/२५ नुसार यवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
What's Your Reaction?






