थेट 353 दाखल करा 'आपलं वाटोळं झालंय' अजितदादा संतापले ! वाचा नेमकं काय घडलं होतं

आय मिरर
हिंजवडी आयटी पार्कच्या विकासकामांमध्ये होत असलेल्या अडथळ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. पहाटेच्या सुमारास अचानक पाहणी दौऱ्यावर गेलेल्या पवारांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आणि कामाला अडथळा करणाऱ्यांवर थेट 353 कलम लागू करण्याचे आदेश दिले.
हिंजवडी आयटी पार्कमधील रखडलेल्या प्रकल्पांमुळे नाराज झालेल्या अजित पवारांनी थेट सरपंच गणेश जांभुळकर यांना सुनावले. 'आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं आयटी पार्क महाराष्ट्राबाहेर चाललंय… बेंगलोर, हैदराबादला… तुम्हाला काही पडलंच नाही का?' अशा शब्दांत त्यांनी सरपंचांना धारेवर धरलं.
पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या की, 'कोणीही कामात अडथळा आणला, मग तो कोणताही असो - अगदी मी सुद्धा - त्याच्यावर थेट 353 लावा. माझं, त्याचं काही नका बघू. विकासकामं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत.' त्यांच्या या थेट आणि कडक आदेशामुळे प्रशासन हलकं झालं आहे.
सकाळी ६ वाजताच अजित पवारांनी हिंजवडी परिसरात थेट पाहणी दौरा सुरू केला. यावेळी वाहतूक कोंडी, रस्ते, मेट्रोच्या प्रगती, आणि नागरी सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन झालं आहे का, हे पाहण्यासाठी ही आकस्मिक भेट होती.
अजित पवार यांचा संताप इतका होता की त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारलं, 'मी सहा वाजता इथं येतो, पण अजून काही लोक जागेही नाहीत! मला समजत नाही, माझी माणसं कुठं आहेत?' त्यांनी पुन्हा अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की कुणीही काम थांबवू नये, आणि सर्व अडथळे बाजूला सारावेत.
हिंजवडी आयटी हबचा विकास अडथळ्यांमुळे रखडल्यास, राज्यात गुंतवणूक संधींचा अपुरा उपयोग होतो. अजित पवारांनी या संदर्भात वेळोवेळी संबंधित यंत्रणांना झापलं असून आता त्यांचा थेट मैदानात उतरून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींनी आता या सूचनांचा किती प्रभावीपणे अंमल केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
What's Your Reaction?






