इंदापूरच्या ग्रामीण भागात सर्वाधिक बुद्धिबळपटू निर्माण करण्यास शहा ना.रा.पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कटिबद्ध - भरत शहा

Oct 17, 2023 - 12:07
 0  194
इंदापूरच्या ग्रामीण भागात सर्वाधिक बुद्धिबळपटू निर्माण करण्यास शहा ना.रा.पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कटिबद्ध - भरत शहा

आय मिरर

इंदापूर सारख्या ग्रामीण भागात अधिकाधिक बुद्धिबळपटू तयार व्हावेत व त्यासाठी शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कायम कटिबद्ध राहील. बुद्धिबळ हा राजा-महाराजांचा खेळ असून व्यक्तीच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी हा महत्त्वाचा खेळ असून नेहमी सामाजिक कार्यात शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा सहभाग असतो पुढेही तो कायम राहिल अशी ग्वाही शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वेसर्वा भरत शहा यांनी यावेळी दिली.शहा नारायनदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने इंदापूर शहरात एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धांचे दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

खुल्या गटात अजिंक्य ठरलेला वीरेश शरणार्थी प्रथम पारितोषिक व इंदापूर चषकाचा सलग दुसऱ्या वर्षी देखील मानकरी ठरला. सात पैकी सहा गुणांसह श्रीराज भोसले व साहिल शेजळ द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीचे मानकरी ठरले.शाकुर मलंग शेख चार गुणांसह सर्वोत्कृष्ट इंदापूरकर स्पर्धक ठरला. विशाल चिंतामणी व ऋषिकेश गायकवाड अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे विजेते ठरले.

शहा म्हणाले की, इंदापूर मध्ये व्यावसायिक बुद्धिबळ प्रशिक्षणाची नांदी झाल्यावरच बुद्धिबळ खेळाचा झपाट्याने विकास होईल आणि तो दिवस लवकरच उजाडेल. या स्पर्धांमुळे बुद्धिबळ खेळाच्या भवितव्याविषयी इंदापूर मध्ये निर्माण झालेले चित्र आशादायक आहे.इंदापूर सारख्या ग्रामीण भागात बुद्धिबळ चा विकास करण्यासाठी बुद्धिबळच्या स्पर्धा व मार्गदर्शनपर शिबिर यांचे नियमित नियोजन होण्यासंबंधी मार्गदर्शन करीत सहभागी स्पर्धकांपैकीच एखादा ग्रँड मास्टर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांनी डीप माईंड चेस अकॅडमीचे देखील कौतुक केले.

सदर स्पर्धा चार गटांमध्ये खेळवली गेली. खुला गट, पंधरा वर्षाखालील गट, बारा वर्षाखालील गट व नऊ वर्षाखालील गट. स्पर्धेमध्ये एकूण १,३०,००० पेक्षा अधिक रकमेची बक्षिसे त्यासोबत चषक व पदक यांची कमाई स्पर्धकांनी केली. 

इंदापूर सोबतच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना इत्यादी जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. पावणे दोनशे पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ११० पेक्षा अधिक बक्षिसे विजेत्यांमध्ये वाटली गेली. 

शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वेसर्वा भरत शहा यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार वृक्षरोप व पुस्तके देऊन करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे इंदापूर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते संदीप वाशिंबेकर आणि राहुल सिनेमा थेटर चे मालक रोहन गुंडेकर यांच्यामध्ये पहिला औपचारिक बुद्धिबळ चा सामना होऊन स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. याप्रसंगी अंगद शहा यांनी स्वतः स्पर्धेमध्ये भाग घेऊन इंदापूर व पंचक्रोशीतील स्पर्धकांचा उत्साह वाढवला.याप्रसंगी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली.

शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे भरत भाऊ व इंडियन मेडिकल असोसिएशन चे सचिव डॉ.संजय शहा आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे मा.अध्यक्ष नंदकुमार गुजर यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. याप्रसंगी राहुल गुंडेकर, डॉ.पोरे,नागनाथ हळकुडे, नजीर काझी,अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. संजय शहा यांनी स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक केले व इतर स्पर्धकांनी मनोबल ढासळू न देता पुन्हा स्पर्धेत भाग घेऊन पदक जिंकण्याची इच्छा मनात ठेवून कामाला लागावे असे आवाहन केले.

नागनाथ हळकुडे यांनी शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट बुद्धिबळ खेळाच्या विकासासाठी करत असलेल्या कामाचा गौरव करून पुढील वर्षी देखील अशाच भव्य स्पर्धा व्हायला हव्यात व हा स्पर्धांचा सिलसिला चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

पंधरा वर्षाखालील गटात जिया शेख सहा गुणांसह अव्वल क्रमांकावर राहिली; तर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आदित्य कोळी व आयुष सोनवणे यांनी पटकावले. या गटात सर्वोत्कृष्ट इंदापूरकर श्लोक फडे ठरला. श्रेयस माने याने द्वितीय व आदिती भगत हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

बारा वर्षाखालील प्रवर्गाचा सर्व लढतीमध्ये अपराजित राहिलेला साईराज घोडके चॅम्पियन ठरला. द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सोहम कुटे व सार्थक जाधव यांनी मिळवले. याच प्रवर्गात सर्वोत्कृष्ट इंदापूरकर खेळाडू प्रज्ञा कांबळे ठरली तर प्राजक्ता मारकड व अद्वैत घोगरे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

नऊ वर्षाखालील गटात श्रेयस कुदळे या खेळाडूने सहा गुणांसह प्रथम पारितोषिक पटकावले. शौर्य भोंडवे याने द्वितीय व सृष्टी मुसळे हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.या गटात प्रभास गोरे सर्वोत्कृष्ट इंदापूरकर ठरला. राजरत्न कांबळे याने द्वितीय व श्रवण इंगुळे याने तृतीय क्रमांक मिळवला.

सात वर्षाखालील गटात हर्ष मुसळे या चिमुकल्या खेळाडूने प्रथम क्रमांकाचे पदक जिंकले तर पृथ्वी लांडगे व अरहंत डुचल यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस जिंकले.१०००-१२५० रेटिंग प्रवर्गाचा विजेता अथर्व बखरे, १२५१-१५०० या प्रवर्गाचा विजेता आशिष चौधरी तर अनरेटेड प्रवर्गाचा विजेता संदेश बजाज यांना घोषित करण्यात आले.सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू किरण गोरे, सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू सुरू नंदकर, सर्वोत्कृष्ट महिला अनुक्रमे संपदा बोळे व नेहा वाघ, सर्वोत्कृष्ट शाळा प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी आणि सोलापूर चेस अकॅडमी सर्वोत्तम ठरली.

तासगांव चा अभिजित कांबळे या दिव्यांग खेळाडूने १०००-१२५० या प्रवर्गात दुसरे बक्षीस पटकावून 'बुद्धिबळ हा खेळ खेळण्यास कोणतीही शारीरिक अडचण बाधा आणू शकत नाही' हेच जणू सिद्ध केले. आयोजक, पालक व इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी अभिजित व त्याच्या पालकांचे भरभरून कौतुक केले.

स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या खेळाडूंनी, पालकांनी व प्रेक्षकांनी दिवसभर बुद्धिबळ खेळाचा मनमुराद आनंद लुटला. सबंध महाराष्ट्रातून आलेल्या स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था देखील शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली होती. स्पर्धक व पालकांनी उत्कृष्ट आयोजन व दातृत्वाबद्दल श्री.भरत भाऊ शहा यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

भारतभर बुद्धिबळ स्पर्धेतून काम करणारे फिडे आर्बिटर शार्दुल तपासे व त्यांच्या आर्बिटर टीमने स्पर्धा वेळेत सुरू करून वेळेतच संपवल्या. स्पर्धेत सूर्याजी भोसले,उद्धव पाटील,रोहिणी तुम्मा,मोक्षदा महाजन,संग्रह कांबळे, पल्लवी शिंदे,आकाश गायकवाड यांनी पंच म्हणून कामकाज पाहिले. 

उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्रेयस कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल कांबळे व अक्षय कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम डीप माइंड चेस अकॅडमी चे प्रमुख दिपंकर कांबळे यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहिल शेख, शुभम कांबळे, स्वामी वीरभद्र, राधेश्याम यादव, तौफिक शेख, राहुल जाधव, अख्तर मोमीन आणि शहा सांस्कृतिक भवन चे सर्व कर्मचारी यांनी कष्ट घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow