गुणवंत विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद- आमदार दत्तात्रय भरणे
आय मिरर
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे,उपाध्यक्ष अमोल पाटील तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,विविध पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी समाजाप्रती आपण देणे लागतो ही भावना सदैव मनामध्ये ठेवून आयुष्यात यशस्वी होत असताना आई-वडिलांचा गुरुजनांचा तसेच समाजाचा मान ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आई-वडिलांनी वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून तुमच्या शिक्षणासाठी वेळ दिला तसेच पैसा पुरवला आहे,त्यामुळे त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आई-वडिलांचे, गुरुजनांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार मेहनत करा,कष्ट करा एक दिवस तुम्हाला निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे आमदार भरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.तसेच जीवनामध्ये तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रामध्ये स्वतःला सर्वस्वी झोकून देऊन अविरतपणे कष्ट केले आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहिला तर एक दिवस तुम्ही त्या क्षेत्रामध्ये निश्चितच क्रमांक एक वरती राहून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिला.
त्याचबरोबर छत्रपती सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा देखील सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भरणे यांनी बोलताना सांगितले की सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर सातत्यपूर्ण अभ्यास तसेच योग्य मार्गदर्शनाची गरज असते.सध्या वेगवेगळ्या शाळा, अकॅडमी तसेच ट्युशन्स अशा वेगवेगळ्या मार्गाने विद्यार्थी अभ्यास करत असतात. यामुळे स्पर्धा वाढली आहे याच गोष्टी लक्षात घेऊन नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे .तसेच समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे अत्यावश्यक आहे.
जीवनामध्ये संस्कार मूल्य निर्माण करून व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम शिक्षण करते तसेच यशस्वी जीवनाचे ज्ञान हे फक्त शिक्षणातूनच मिळते असेही आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील बारावी चा निकाल 96.51% इतका लागला असून इंदापूर तालुक्यातील दहावीचा निकाल 97.45% लागला असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली..
What's Your Reaction?