आज पाटलांच्या गावात आमदार भरणेंचा आवाज ! 3 कोटी 33 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन अन् जाहिर सभा

Feb 22, 2024 - 08:03
 0  1111
आज पाटलांच्या गावात आमदार भरणेंचा आवाज ! 3 कोटी 33 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन अन् जाहिर सभा

आय मिरर(देवा राखुंडे)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष आणि इंदापूरच्या राजकारणातील व्यक्तिमत्व महारुद्र पाटील यांच्या गंगावळण गावात आज गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आणि पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली 3 कोटी 33 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन ,उद्घाटन होणार असून आ.भरणे यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

इंदापूर तालुक्यात लोकसभा आणि विधानसभेचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत. जसजश्या निवडणुका जवळ येतील तसं तसं राजकारण तापू लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वेळा महारुद्र पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात जाहीरपणे गरळ ओकली आहे. महारुद्र पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना गेल्या काही दिवसापासून लक्ष केल्याचं पाहायला मिळत असून त्यांच्यावर जोरदार टीका करताना ते पाहायला मिळत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या गंगावळण मधील जाहीर सभेत आमदार दत्तात्रय भरणे यांच्या टार्गेटवर महारुद्र पाटील असणार यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे आमदार भरणे हे महारुद्र पाटील यांच्या गावात जाऊन महारुद्र पाटील यांना काय उत्तर देणार याकडे आत्तापासूनच तालुक्याची नजर लागली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी महारुद्र पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष आहेत.गेल्या काही दिवसापासून महारुद्र पाटील हे आक्रमकपणे आमदार भरणेंविरोधात बोलताना पाहायला मिळत आहेत. आता लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यानं उद्याच्या या जाहीर सभेत दत्तात्रय भरणे हे महारुद्र पाटलांचा नेमका काय समाचार घेणार हे पाहणं हे महत्त्वाचं असणार आहे.

गंगावळण हे महारुद्र पाटील यांचं स्वतःचं गाव आणि महारुद्र पाटील हे इंदापूर तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असणारे पक्के राजकारणी. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी गंगावळण ग्रामपंचायतचे सरपंच आणि काही सदस्यांनी या सोबतच विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांनी महारुद्र पाटील यांची साथ सोडत आमदार दत्तात्रय भरणे यांना पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच घड्याळ त्यांनी हाती बांधल्याने महारुद्र पाटील यांच्यासाठी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सुद्धा तो धक्का मानला गेला.

मागील वर्षभरापूर्वीच गंगावळण ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती, यावेळी महारुद्र पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनेल ची सत्ता ग्रामपंचायत वरती आली होती आणि आमदार भरणे यांना महारुद्र पाटील यांनी धक्का दिला होता. मात्र फोडाफोडीच्या राजकारणात माहीर असणारे दत्तात्रय भरणे यांनी अगदी काही दिवसातच गंगावळणचे सर्व मासे गळाला लावले आणि महारुद्र पाटील यांना हम भी होशियार है म्हणत धक्का दिला.

तर गंगावळण ग्रामपंचायत मध्ये हर्षवर्धन पाटील म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या विचाराची सत्ता होती.प्रशांत गलांडे पाटील हे गंगावळणचे युवा नेतृत्व असून प्रशांत गलांडे पाटील हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक होते. तर गलांडे पाटील यांच्या पत्नी निकिता प्रशांत गलांडे पाटील या गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.मात्र गेल्या काही दिवसापूर्वी प्रशांत गलांडे पाटील यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन आणि संचालकांसह भाजपचा रस्ता सोडत राष्ट्रवादीची वाट धरल्याने हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला गेला. त्यामुळे आमदार भरणे हे उद्याच्या सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावरही राजकीय टोलेबाजी करण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, मा.जि.प. सदस्य प्रताप पाटील,श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले,मा.पं.स.सदस्य सतीश पांढरे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे, सचिन सपकाळ ,दीपक जाधव, बाळासाहेब ढवळे, संग्रामसिंह पाटील, संदेश देवकर, संजय सोनवणे, साधना केकान ,नवनाथ रुपनवर, शिवाजी तरंगे,बाळासाहेब काळे,शुभम निंबाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच निकिता प्रशांत गलांडे पाटील, उपसरपंच अभिजीत नलवडे ,चेअरमन नितीन पवार, उज्वला रमेश जगताप ,नंदा बाळासाहेब वाळुंजकर ,लक्ष्मी अभिमन्यू सोनवणे ,सुमन रोहिदास लोंढे, गणेश उद्धव जगताप, रामहरी माणिक विपट यांसह ग्रामस्थांनी केल्याची माहिती बारामती लोकसभा राष्ट्रवादी युवकाध्यक्ष प्रशांत गलांडे पाटील यांनी दिली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow