खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी सरकारने घेतला हा मोठा निर्णय,आमदार भरणेंनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार
आय मिरर
शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनींचे धारणाधिकार देण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून याबद्दल खंडकरी शेतकऱ्यांसह माजी मंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
खंडकरी शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची शेती व कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात ऑक्टोबर महिन्यात आढावा बैठक झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठक घेऊन खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश आणि या बैठकीतील चर्चेनुसार सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात आला होता. त्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणारा खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींसंदर्भातील प्रश्न निकाली निघणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांतून सकारात्मक निर्णय झाल्याने खंडकरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
What's Your Reaction?