उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ही दत्तात्रय भरणे सावध पवित्र्यात ; वाचा सविस्तर
आय मिरर
राज्यात सर्वच इच्छुक विधानसभेच्या उमेदवारीसाठी आस लावून बसले आहेत, त्यामध्ये विद्यमान आमदारांसह नवीन इच्छुकांचा देखील समावेश आहे.इंदापूरची विधानसभेची जागा उमेदवारीवरून नेहमीच चर्चेत असते मात्र यावर्षी वेगळाच प्रत्यय येताना दिसत आहे. दत्तात्रय भरणे हे सावध पवित्र्यात असून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील वेगळ्याच हालचाली सुरू केल्याच्या पाहायला मिळत आहेत.
महायुती कडून अद्याप इंदापूर विधानसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब झाला नसतानाही हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीचा घाट घातला आहे. एक ऑगस्ट रोजी इंदापूरच्या बावडा गावात इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली आणि त्यानंतर गावोगावी आता या शाखा स्थापन केल्या जात आहेत. दुसरीकडे आपण भाजपमध्येच असून इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय झालेला नाही योग्य वेळी तो निर्णय होईल आणि आमचे नेते योग्य निर्णय करतील असा विश्वास ही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते चुकत नाहीत त्यांच्या भावना आहेत आपला नेता आमदार व्हावा असं कोणालाही वाटतं कदाचित त्यांच्या नेत्यांच्या त्या भावना असतील म्हणूनच तालुक्यात विकास आघाडीच्या शाखा स्थापन केल्या जात असाव्यात. मात्र आमचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस इंदापूरच्या जागेबाबत जो निर्णय घेतील तो निर्णय आपण मान्य करू आणि त्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील देखील तो निर्णय मान्य करतील असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकी वेळी आमदार भरणे यांचे सहकारी असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आता अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज त्यांनी आमदार होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.यावरून दत्तात्रय भरणे असे म्हणतात की प्रत्येकाला वाटतं आपण आमदार व्हावं यात गैर काय ? ही लोकशाही आहे कदाचित प्रवीण माने यांची ही इच्छा असावी आणि त्यांनी व्यक्त केलेली इच्छा मला चुकीची वाटत नाही असेही भरणे यांनी म्हटलं आहे.
What's Your Reaction?