बारामती सह राज्यात महायुती जिंकणार - हर्षवर्धन पाटील 

May 31, 2024 - 21:37
May 31, 2024 - 21:40
 0  660
बारामती सह राज्यात महायुती जिंकणार - हर्षवर्धन पाटील 

आय मिरर

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या दिवसांवर आला आहे. मतमोजणी 4 जूनला होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यामध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असा विश्वास यावेळी बोलताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.ते इंदापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

इंदापूर येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी विविध विषयांवरती संवाद साधला. ते म्हणाले, ग्रामपंचायतींकडून आलेल्या टँकर मागणीच्या प्रस्तावांना 12 तासात मंजुरी द्यावी, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा सूचना बारामतीचे प्रांत अधिकारी, इंदापूरचे तहसीलदार यांना केल्या आहेत. मध्यंतरी वादळामुळे इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पिके, फळबागा यांचे नुकसान झाल्याने पंचनामे झाले आहेत. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये तसेच राज्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शुक्रवारी (दि.31) केले.              

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचेवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. आज सकाळीच मी त्यांची व कुटुंबीयांची भेट घेतली. तुंम्ही तहसील कार्यालयात जावून नेहमीप्रमाणे कामकाज चालू ठेवा व कर्मचाऱ्यांना बेमुदत संपापासून परावृत्त करून, तालुक्यातील जनतेला अडचणी येऊ देऊ नका, अशी माझी त्यांचे बरोबर चर्चा झाली आहे. त्यानुसार ते आता तहसील कार्यालयात गेले आहेत. इंदापूर तालुक्याची संस्कृती चांगली आहे. सन 1952 पासून शंकररावजी भाऊ पासून व नंतर वीस वर्षे आंम्ही सत्तेवर असताना असे कधीही घडलेले नाही, यास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आंम्ही केली आहे.        

देशभरातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन मी व कुटुंबियांनी घेतले, त्यामुळे मध्यंतरी आंम्ही तालुक्यामध्ये नव्हतो. यादरम्यान कळाशी येथे घडलेली बोट दुर्घटना ही दुर्दैवी आहे, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील धनंजय डोंगरे यांच्या कुटुंबासह इतरांची भेट मी घेणार आहे. बोट प्रवासादरम्यान प्रवाशांनी जॅकेट व इतर सुरक्षा साधने वापरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनीकेले.          

उजनी धरणामध्ये डिसेंबर महिन्यात 72 टक्के एवढा मोठा पाणीसाठा होता. उजनीतील पाणीसाठा वापराचे जर योग्य नियोजन झाले असते तर आज चांगली परिस्थिती दिसली असती. मात्र सध्या उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर उजनीतील जलसाठ्याचे उच्चस्तरावरती नियोजन होणे गरजेचे असल्याची चर्चा करणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow